आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,29 एप्रिल 2025

थायलंडहून भारतात हवाई मार्गाने हायड्रो गांजा मागवून देशात विक्री करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. या टोळीत दहा जणांचा समावेश असून त्यामध्ये परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिक्षक, हवाला व्यवहार करणारे दोघे तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दहा जणांना 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नेरूळ सेक्टर 15 इथं अंमली पदार्थ विरोधी पथकाने 14 एप्रिल रोजी एक विशेष कारवाई केली. या कारवाईमध्ये आशिष गवारे याच्या राहत्या घराशेजारी सापळा रचून त्याच्या घराच्या गच्चीवर आरोपी आशिष गवारे, अहमद खालेद ऑलगी व आकाश मौर्या हे हायड्रो गांजाची विक्री करण्याकरीता व्यवहार करत होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आकाश मौर्या पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांना विक्रीकरीता आणलेला १७.१९ ग्रॅम वजनाचा एकुण २ लाख ७६ हजार ५०० रूपये किंमतीचा हायड्रो गांजा (इम्पोर्टेड गांजा) हा अंमली पदार्थ मिळून आला. या दोघांवरही नेरूळ पोलीस ठाण्यात एन.डी.पी. एस. कायदयांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे वाचा : भाषेचा अभिमान आणि संवर्धन

या दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सुजित बंगेरा व साहिल लांबे व इतर आरोपी हे हायड्रो गांजा थायलंड मधून भारतात एअरपोर्ट मार्गे मागवित असल्याची माहिती दिली. हा माल विमानतळावर आल्यानंतर आरोपी कमलेश चांदवानी उर्फ के. के. हा परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिकारी प्रशांत गौर याच्या मदतीने सदरचा माल सोडवून त्याची विक्री करत होता इतर आरोपींच्या मदतीने नवी मुंबई परिसरामध्ये विक्री करत असल्याची माहिती दिली. या टोळीतील कमलेश चांदवानी उर्फ के. के. हा पोलीस हवालदार सचिन भालेराव याच्या संपर्कात होता. आरोपी सचिन भालेराव आणि आरोपी संजय प्रल्हाद फुलकर हे दोघेही गुन्हा घडल्यानंतर वारंवार एकमेकांच्या संपर्कात असल्याने या दोन्ही पोलीस अंमलदारांना सुध्दा अटक करण्यात आली आहे.

यातील अटक आरोपीत सुजित बंगेरा व कमल चांदवानी यांचेकडुन रोख रक्कम घेवुन त्याबदल्यात USDT च्या माध्यामातुन पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. सदर पैशांचा व्यवहार हा अंमली पदार्थाचे विक्रीतील असल्याने अंकित पितांबरभाई पटेल व रिकुंदकुमार दिनेशभाई पटेल या आंगडीयाचा व्यवसाय करणा-यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

हे वाचा : वाहतूककोंडीचा बेशिस्तपणा

या टोळीकडून आतापर्यंत 16 लाख 43 हजार रूपयांचे अमली पदार्थ, 14 लाख 12 हजार 650 रूपयांची रोख रक्कम, 4 वाहनं, इतर मुद्देमाल असा 73 लाख 93 हजार 935 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, अमित काळे गुन्हे शाखा, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सांदिप निगडे, अंमली पदार्थ विरोची कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई हे आहेत.

========================================================


========================================================