व्हीआयपी कल्चर मनातूनही काढून टाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली, 30 एप्रिल :

गाडीवरील लाल काढून टाकणे हा सरकारी निर्णयाचाच भाग आहे. केवळ गाडीवरून लाल दिवा काढूनच चालणार नाही तर आपण मनातूनही प्रयत्नपूर्वक ते विचार काढून टाकायला हवे. देशात व्हीआयपीच्या ऐवजी ई पी आयचे महत्व वाढावे. व्हीआयपी ऐवजी ईपीआय (एव्हरी पर्सन इम्पॉरटन्ट) म्हणजेच देशातली  प्रत्येक व्यक्ती महत्वपूर्ण असून, या प्रत्येकाला प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या मन की बात या कार्यक्रमातून केले.

प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे महत्व असून प्रत्येकामध्ये चाणाक्ष आणि सुज्ञ पणाचे अनोखे वलय असते. सव्वाशे कोटी देशबांधवांचे महत्व स्वीकारा असे मोदी यांनी सांगितले.

युवकांनी चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी करायला पाहिले. त्यांनी नवी ठिकाणे, नवे अनुभव आणि नवीन कौशल्ये पडताळून पाहिली पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीत युवकांनी नवीन अनुभव घ्यावेत तसेच कुठल्याही विषयाबद्दलचे कुतूहल पूर्ण करावे, असेही पंतप्रधानांनी सुचवले.

जीवनात खूप मोठे होण्याचे स्वप्न बाळगणे तसेच जीवनात काही उद्दिष्ट असणे ही चांगली गोष्ट आहे. युवकांनी आपले लक्ष्य नक्कीच साध्य करावे पण त्याबरोबरच त्यांच्यातील मानवी घटक कुठे कंटाळत नाही ना?  आणि ते मानवी मुल्यांपासून दूर जात नाहीत ना? यासंदर्भातही त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.