कर्जत भीमाशंकरचा प्रकल्प उद्योगपतीच्या भल्यासाठी, विकासाला नाही विनाशाला विरोध, पर्यावरणाची हानी कशासाठी?: हर्षवर्धन सपकाळ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 28 ऑक्टोबर 2026

कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही, पण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून कसला विकास करणार आहोत. हा प्रकल्प केवळ उद्योगपतीचे चांगभलं करणारा असून हजारो झाडे दुसरीकडे लावण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हास्यास्पद आहे, असा विनोद राज्याला परडवणारा नसून महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव हल्ली फारच विनोदी झाला आहे, सह्याद्रीच्या भागात लाखो झाडे लावण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, ही वृक्ष लागवड कुठे केली हे कोणालच माहित नाही, त्यामुळे त्यांचा हा विनोद राज्याच्या पर्यावरणाला आणि लोकांच्या आरोग्याला पेलणारा नाही. वसुंधरा जपली पाहिजे, जंगल संवर्धन झाले पाहिजे. पण राज्यात खाजगी कंपनीचे चांगभलं करण्यासाठी झाडांची कत्तल सुरु आहे. फडणवीस जे बोलत आहेत ती हातचलाखी आहे. झाडे तोडून विकास नको तर शास्वत विकास असावा. या प्रकल्पासाठी राज्यात अनेक जागा आहेत त्याठिकाणी प्रकल्प होऊ शकतो पण त्यांना चौथी, पाचवी मुंबई करायची आहे, त्याची चाचपणी सुरु आहे.
विकासाला कोणाचाच विरोध नाही, विनाशाला विरोध आहे. फडणवीस सरकारच्या काळातच राज्यातील ४० हजार उद्योग बंद पडले, त्याला कोणी विरोध केला नव्हता. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाला कोणी विरोध केला नव्हता तो गुजरातला का गेला? वाढवण बंदर सुद्धा स्थानिकांच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकल्प आहे. शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नाही तरीही तो प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या २९ ॲाक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कर्जत येथे पोहोचून भिमाशंकर अभ्यारणात टोरंट विद्युत प्रकल्पासाठी सुरु असलेल्या वृक्षतोडीची पाहणी करून स्थानिक गावक-यांशी संवाद साधणार आहेत.