नवी मुंबईत आठही विभागांत 40 हजार वृक्षांची होणार लागवड

  • प्रत्येक व्यक्तीमागे 1 झाड लावण्यासाठी महापालिकेचे नियोजन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 12 जुलै  2022:

सन 2022-23 या वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागात एकूण 40 हजारहून अधिक वृक्ष लागवडीचे उदिदष्ट ठेवण्यात आलेले आहे. वृक्ष लागवड करताना त्यामध्ये पक्षी, प्राणी, किटक यांचा अधिवास होईल व जैवविविधता वाढीस लागेल अशाप्रकारे देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये वड, पिंपळ, बहावा, ताम्हण, निंब, बकुळ, बांबू तसेच काही ठिकाणी फळझाडांचीही लागवड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. वृक्षारोपांची लागवड करताना ज्या क्षेत्रात झाडे लावण्यात येणार आहेत तेथील भौगोलिक स्थितीचा विचार करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 2021’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पुरस्काराच्या गुणांकनामध्ये शहरातील वृक्षसंपदा हा एक महत्वाचा घटक आहे. सध्या नवी मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक 4 व्यक्तींमागे 3 झाडे असे वृक्षप्रमाण असून, ते प्रत्येक व्यक्तीमागे 1 असे करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे.

यासाठी मागील दोन वर्षांपासून कमी जागेत अधिक झाडे असणा-या मियावाकी स्वरुपाच्या शहरी जंगल निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोदयानामध्ये 60 हजार देशी प्रजातींची मियावाकी स्वरुपात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 28, नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या पर्यटकांना भावणा-या परिसरात 1 लाख 30 हजार वृक्षरोपांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे भारतातील हा सर्वात मोठा मियावाकी स्वरुपाचा शहरी जंगल प्रकल्प आहे. मियावाकी स्वरुपातील हे वृक्षारोपण व संवर्धन ग्रीन यात्रा या पर्यावरण क्षेत्रातील नामांकित संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेचा काहीही खर्च न होता सीएसआर निधीतून करण्यात आलेले आहे.

मियावाकी जंगल स्वरुपात 2 लाखाहून अधिक वृक्षारोपण

अशाचप्रकारे ग्रीन यात्राच्या माध्यमातून सेक्टर 15, बेलापूर येथील नागा गणा पाटील उदयानात 3 हजार, सेक्टर 18, तुर्भे मलप्रक्रिया केंद्रानजिक 5500, सी होम्स सोसायटी समोरील पामबीच मार्गाला समांतर रस्त्याजवळ 2 हजार तसेच सांनपाडा येथील हावरे सर्कलच्या बाजूला 1500 अशाप्रकारे 2 लाखाहून अधिक वृक्षारोपण मियावाकी जंगल स्वरुपात करण्यात आलेले आहे. मियावाकी स्वरुपात होणारी वृक्ष लागवड पावसाळ्याच्या आधी केली जाते. त्यामुळे ही वृक्ष लागवड जून महिन्याच्या आधीच करण्यात आली असून त्यापुढील पावसाळी कालावधीतही मोठया प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

अभियांत्रिकी विभागाला दक्षता घेण्याचे निर्देश 

सद्यस्थितीत रस्त्यांची कामे करताना त्याठिकाणी असलेल्या झाडांची हानी होणार नाही याची दक्षता अभियांत्रिकी विभागामार्फेत घेतली जात आहे. त्याचप्रमाणे नवी वृक्ष लागवड करतानाही भविष्यांत वाहतुकीला व रहदारीला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही अशाप्रकारे वृक्ष लागवड करण्याची दक्षता घेतली जावी असे निर्देश महापालिका आयुक्त बांगर यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत.

पावसाळी कालावधीत वृक्षलागवड

  • पावसाळी कालावधीत करावयाच्या या नियोजित वृक्ष लागवडीमध्ये नेरूळ येथे ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात 1500 बांबूची वृक्षरोपे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लावण्यात आलेली आहेत. तसेच वाशी, सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर परिसरात राजीव गांधी जॉगीग ट्रॅक भोवताली 2780 बांबूची लागवड करण्यात आलेली आहे.
  • त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभागात सेक्टर 19 येथील धारण तलाव परिसरात पेरु, जांभूळ, चिकू, चिंच, फणस अशी 700 वृक्षरोपे लागवडीचे काम सुरू आहे. याशिवाय गवळीदेव रोड एमआयडीसी परिसरात 2 हजार, महापे ते शिळफाटा रस्ता 1 हजार, महापे ते इंदिरानगर रस्ता 1 हजार वृक्षरोपांची लागवड सुरू आहे.
  • घणसोली विभागातही सेक्टर 4 नाल्यानजिक सुपारीची 900 वृक्षरोपे तसेच गोठिवली खदाण तलाव परिसरात 1 हजार फळझाडांची वृक्षरोपे लावली जात आहेत. ऐरोली रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या रस्त्यावर 950 शंकासुराची वृक्षरोपे लागवड सुरु आहे.
  • अशाच प्रकारे बेलापूर विभागात सेक्टर 14,15,11 येथील रस्त्यांच्या कडेला 7 हजार, सेक्टर 10,11, दिवाळे गाव व पारसिक हिल रस्ता येथे 4 हजार, सेक्टर 28 नेरुळ येथे नवीन रस्त्यानजीक 1 हजार देशी वृक्षरोपे लावण्याचे नियोजन आहे.
  • नेरुळ विभागात सेक्टर 23, 24 मैदानाभोवताली 1 हजार व विविध रस्त्यांच्या कडेला 3 हजार सावली देणारी वृक्षरोपे लागवड करण्याचे नियोजन आहे.
  • वाशी विभागात सेक्टर 8 सागर विहार ते पंप हाऊस येथे 2500 तसेच सेक्टर 6 ते सेक्टर 10 येथे 600 बांबूचे वृक्षारोपण प्रस्तावित आहे. याशिवाय सेक्टर 12 वाशी येथे ओरिएन्टल कॉलेज ते सर्व्हिस रोड येथे 800 व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेक्टर 28 येथे 400 वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे.
  • तुर्भे विभागात सेक्टर 18 व 19, एपीएमसी मार्केट परिसरात 2 हजार व सेक्टर 23 कोपरी तलाव व नाल्याच्या परिसरात 1500 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
  • कोपरखेरणे विभागात तसेच अडवली भूतावली परिसरात 700 फळ झाडांची वृक्षरोपे लावण्यात येणार आहेत.
  • घणसोली विभागात रस्त्यांनुसार विशिष्ट संकल्पना राबवित वृक्षलागवड करण्याचे नियोजन असून ठराविक रस्त्यांवर विशिष्ट प्रकारचे वृक्षारोपण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ठाणे बेलापूर मार्गानजिक 1500, पामबीच मार्गालगतच्या मोकळया जागी 500 तसेच सेक्टर 6 नाल्यानजिक 1 हजार बांबूची वृक्ष लागवड प्रस्तावित आहे. घणसोली पामबीच मार्गावर 1 हजार सुगंधी चाफ्याची वृक्ष लागवड करणे प्रस्तावित आहे.
  • ऐरोली विभागात सेक्टर 19 व 20 मध्ये रस्त्याच्या कडेला 1 हजार मिश्र देशी वृक्षरोपे लागवड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

पावसाळी कालावधीत कोणत्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे व कोणती झाडे, कोणत्या ठिकाणी लावायची याची उदयान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व कालावधीत क्षेत्रपाहणी करुन आखणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार वृक्ष लागवड करण्यात येत आहे.


  • मागील बातम्यांवर दृष्टिक्षेप