जनमत, मतदानोत्तर चाचण्यांवर बंदी

 ठाणे, 31 जानेवारी 2017/AV News Bureau:

 महापालिका निवडणुकांनंतर लगेचच काही ठिकाणी जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदारांवर कुठल्याही प्रकाराचा प्रभाव पडू नये या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकांची जाहिर प्रचार बंदी झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर चाचणी घेण्यावर राज्य निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नुकताच एक आदेश निर्गमित केला आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात या पार्शवभूमीवर हे आदेश निर्गमित करण्यात आले असून महानगरपालिका निवडणुकांची जाहीर प्रचार बंदी 19 फेब्रुवारी, 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून वर्तमानपत्रे, नियतकालिके, माहितीपत्रेके, फलक किंवा तत्सम प्रसिद्धी, खासगी किंवा सरकारी रेडिओ, टि.व्ही. केबल, डीटीएच, प्रादेशिक किंवा स्थानिक केबल टिव्ही, सॅटेलाईट, एसएमएस, इंटरनेट, फेसबुक आणि तत्सम सोशल मिडीया यांच्याद्वारे कुठलीही जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

सदर जनमत चाचणी अथवा मतदानोत्तर निष्कर्षांचा नंतर होणा-या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या मतदारांवर प्रभाव पडेल या कारणास्तव आयोगाने अशा चाचण्यांवर आणि निष्कर्षांवर प्रतिबंध घातला आहे.