स्रीधनाला धोका नाही

मुंबई,2 डिसेंबर 2016 :

घोषित केलेल्या, घरगुती बचतीमधून खरेदी केलेले तसेच वारसाहक्काने मिळालेल्या सोने आणि दागिन्यांवर कोणत्याही प्रकारचा कर लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे लग्नात मिळालेल्या स्रीधनावर कारवाईचा बडगा उगारणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, वारसाहक्काने मिळणारे कितीही सोन्याचे दागिने स्वतःजवळ बाळगू शकता. त्याचप्रमाणे वैध मार्गाने सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर कोणतीही मर्यादा नाही.

केंद्राचे पाऊल

लोकसभेने नुकतेच आयकर कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या नोटबंदी कारवाईत ज्यांची बेहिशेबी मालमत्ता उघड होईल, त्यांच्याकडून ८५ टक्के प्राप्तीकर वसूल करण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. यामध्ये घरातील सोन्याचे दागिने यावरही हा निर्णय लागू होणार असल्याचा वावड्या उटल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) खुलासा केला आहे.

या सोन्यावर जप्ती नाही

विवाहित महिलांना 500 ग्रॅम (50 तोळे) आणि अविवाहित महिलांना 250 ग्रॅम (25 तोळे) आणि प्रत्येक पुरूष 100 ग्रॅम (10 तोळे) इतके सोन्याचे दागिने स्वतःजवळ बाळगू शकतात.मात्र या मर्यादेपर्यंतचे दागिने अघोषित उत्पन्नातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले तरी ते जप्त न करण्याचे आदेश आयकर अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

तर तुम्ही कितीही सोने खरेदी करा

कायदेशीर मार्गाने कितीही सोने किंवा सोन्याचे दागिने नागरिक खरेदी करू शकतात. त्यावर कोणताही कर लागणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारने 1995 च्या आयकर कायद्याचा हवाला दिला आहे.