हापूस आंब्याचा खेळ

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 7 मे 2023

फेब्रुवारी महिना सुरू झाला की कोकणात सर्वांना वेध लागतात ते काजू, आंब्याचे. या फळांचा यंदाचा मोसम कसा असेल याचे अंदाज, आराखडे बांधले जातात. या अंदाजानुसार अपेक्षित उत्पन्नही येते. यंदा मात्र सर्व अंदाज चुकले आणि त्याचा जबर फटका हापूस आंब्याला बसला आहे. यंदा चांगला मोहोर येवूनही अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे उत्पन्न हाती आले नाही मे महिना सुरू असला तरी हापूस आंबा म्हणावा तसा बाजारात दाखल झालेला नाही. मुळातच उत्पादन कमी आणि त्यात हापूसचे दर चढे, यामुळे यंदाच्या वर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या काहीसा आवाक्याबाहेरच राहीला आहे.

हापूसची चव आणि दर्जा याबाबत त्याच्यासारखा दुसरा आंबा नाही. म्हणूनच की काय त्याला फळांचा राजा म्हणून ओळखतात. मात्र आजकाल हा अविट गोडीचा हापूस ताटात येत नाही म्हटल्यावर ग्राहकांनी आता दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या आंब्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. परराज्यांतून मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे समोर दिसेल तो हापूस आंबा अशी काहीशी सध्याची मानसिकता लोकांमध्ये दिसून लागली आहे.

सध्या एकूणच आंब्याची बाजारपेठ पाहता हापूसला भविष्यात तगडी स्पर्धा होण्याची भिती आहे. हापूस आंब्याचे मर्यादीत उत्पादन, हापूस आंब्याच्या वाढलेल्या किंमती हे पण त्याचे एक महत्वाचे कारण आहे. हापूस, हापूस म्हणून व्यापारी, दलाल यांनी आंब्याच्या किंमतींमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादन वाढले तरी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहतो. अशावेळी कोकणातल्या आंब्याचे महत्व कमी करून इतर राज्यातील विशेषतः दक्षिणेकडील राज्यांतील आंबा ग्राहकांच्या माथी मारण्याचीही शक्यता अधिक दिसून येते.

हापूसचे मार्केटींग अनोनात केले जात आहे. त्यामुळेच ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच हापूस बाजारात येणार अशी हाकाटी सुरू होते. पहिली पेटी आली. हापूसच्या या पेटीला इतके हजारो रुपये मिळाले इत्यादी इत्यादी. अशाप्रकारच्या मार्केटींग फंडय़ांमुळे सर्वसामान्या माणसाच्या मनातही हापूसबाबत औत्सुक्य दिसून येते.  मात्र केशरी, बदामी, तोतापूर या आंब्यांच्या आक्रमणापुडे आपला हापूस आता दिसेनासा होऊ लागला आहे.

कोकणातल्या कातळावर पिकणारे आंबा हे फळ ज्याला जीआयएस मानांकन आहे, त्याच्या संवर्धनाची वेळ आली आहे का, अशी शंका येते. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकणारा हा आंबा कोकणकरांचा अभिमान आहे. मात्र हवामान बदलाचा परिणाम जर त्यावर होत असेल तर त्याचे परिणाम या पिकावर होणार आहेत. त्यासाठी यामध्ये विविध संशोधनाचीही आवश्यकता आहे. हवामान बदल होतच राहणार आहे. कोणीही कितीही बेंबीच्या देठापासून कोकलले तरी बदलत्या हवामानाचा फटका हा बसणार हे गृहीत धरूनच आता मार्ग काढायला हवा. याशिवाय कोकणातल्या शेतकऱ्याला हापूस आंब्यातून आर्थिक उत्पन्न मिळवायचे असेल तर दलाल, व्यापाऱ्यांच्या अमिषाला बळी पडता कामा नये. आजकालच्या सोशल मिडियाच्या जमान्यात आपल्या उत्पादनाची जाहीरातबाजी करणे तसे अवघड नाही. प्रामाणिकपणे लोकांसमोर आपला हापूस आबा घेवून गेलात तर त्याला चांगलाच भाव मिळेल. कारण आपा आंबाही तेवढ्याच उत्तम दर्जाचा आहे. त्यामुळे भविष्यात हापूस आंबा संग्रहालयातच पहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी आता कोकणातल्या हापूस उत्पादक शेतकऱ्यांनीही पुढाकार घेवून निर्यातीसोबतच स्थानिक बाजारातही हापूस कसा दिसेल आणि सामान्यांच्या ताटाचीही शोभा वाढवेल हे पाहणे गरजेचे आहे. तरच कोकणातला हापूस आपला दर्जा आणि अस्तित्व कायम राखील हे नक्की.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL