कोकणी मतदारांसाठी काँग्रेस मेळावे घेणार

शिवसेनेच्या या परंपरागत कोकणी मतदाराला वळवण्यासाठी आ. नितेश राणेंची रणनिती

मुंबई, 27 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोकणात विशेषत: सिंधूदुर्ग जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने आता मुंबईतील कोकणी मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. सध्याच्या शिवसेना नेतृत्वाची भाजपसमोरची हतबलता पाहून अस्वस्थ असलेल्या शिवसेनेच्या परंपरागत मतदाराला काँग्रेसकडे आकर्षित करण्याची रणनिती काँग्रेसचे आमदार मा. नितेश राणे यांनी आखली आहे.  त्यानुसार येत्या काही दिवसांत मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघात मुळचे कोकणी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांच्या छोट्या  मेळावे,सभा आणि बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे.

मुळचे कोकणी आणि सध्याच्या मुंबईकरांचे प्राबल्य असलेल्या मध्य मुंबईसह पुर्व आणि पश्चिम उपनगरातील मोजक्या मतदारसंघात या मेळाव्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. पहिला मेळावा येत्या ८ जानेवारीला होणार असून त्याचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाणार आहे. या मेळाव्यांमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना वक्ते म्हणून बोलावण्यात येणार आहे. कोकणातील काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सदस्य, त्याचसोबत जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष किंवा संचालक असलेले काँग्रेसचे नेते असे प्रभावी पदाधिकारी या मेळाव्यांना संबोधित करणार आहेत. मुंबईतील कामगार वर्गावर डाव्या चळवळींचा प्रभाव कमी होत असताना कापड गिरण्यांमध्ये कामाला असलेला हा कोकणातील कामगार वर्ग त्यावेळी शिवसेनेकडे आकर्षित झाला. विशेष म्हणजे शिवसेनेचे सध्याचे अनेक नेते हे मुळचे कोकणातीलच आहेत. कोकणी माणसाला शिवसेनेकडे आकर्षित करण्यात त्यावेळी शिवसेनेत असलेल्या ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा मोठा वाटा होता.

आतापर्यंतच्या शिवसेनेच्या यशात प्रामुख्याने मुळचा कोकणी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या मतदाराचा मोठा वाटा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेना नेतृत्वाकडून या मतदारांचा भ्रमनिरास होत चालला आहे. आता तर भाजपसारख्या मित्राकडून शिवसेना नेतृत्वाला मिळत असलेली वागणूक आणि त्याबद्दल शिवसेनेच्या नेतृत्वाची असलेली हतबलता पाहून हा कोकणी मतदार अस्वस्थ आहे.  त्यामुळं आता कोकणी मतदारांमधील शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढून त्यांच्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून देणार असल्याचे  नितेश राणे यांनी सांगतिलं.