लॉकडाऊनमध्येही आंबा निर्यातीला वेग

इतर फळे आणि कृषी मालाच्या निर्यातीलाही गती 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २६ मे २०२०

लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील ८ हजार ६४० मे.टन आंब्याची निर्यांत कृषि विभागामार्फत करण्यात आली.  १ एप्रिल ते १९ मे २०२०  या कालावधीत केळी,  कांदा,  द्राक्षे,  डाळिंब,  लिंबु,  मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण २ लाख ९९ हजार ९५० मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे.

कृषि विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे.  आंबा  ८  हजार  ६४०  मे. टन,  केळी  ३३  हजार  ९४८ मे. टन, द्राक्षे  ९ हजार ५०९ मे. टन, डाळिंब १ हजार ७७३ मे. टन, कांदा 2 लाख 25 हजार 686 मे.टन,  लिंबु ६५३ मे.टन, मिरची १ हजार ५२२ मे. टन, आले १ हजार १६८ मे. टन, इतर फळे व भाजीपाला १७ हजार ०५१ मे.टन  निर्यात करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबु, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्यावर्षी २३ हजार ४५६ मे.टन तर यावर्षी ३३ हजार ९४८ मे.टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दिडपट झालेली आहे. लिंबुची निर्यात गेल्यावर्षी २८३ मे. टन होती. यावर्षी ६५३ मे.टन झाली आहे.

मुंबई मधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबु निर्यात २३० टक्के झालेली आहे. हिरवी मिरचीची निर्यात गेल्या वर्षीच्या १ हजार ४०९ मे.टन तुलनेत यावर्षी १ हजार ५२२ मे.टन सुमारे ११३ मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात  ८४६ मे.टन होती. यावर्षी १ हजार १६८ मे.टन झालेली आहे.

मागील वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत यावर्षीची निर्यात कमी झालेली असली, तरी कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथुन कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दूरुस्तीच्या सुविधा नसतांनाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणे हे कौतुकास्पद आहे.  पुढील काळात या निर्यातीत मोठया प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा