अन्न विषबाधा एक समस्या

सार्वजनिक सोहळ्यात जेवणातून विषबाधा यासारख्या मथळ्याच्या अनेक बातम्या आपल्या वाचनात येतात. अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना आपल्या आजुबाजूला घडत असतात. त्यामुळे अनेकदा उघड्यावरचे आणि बाहेरचे पदार्थ खाऊ नका, असा सल्ला नेहमीच दिला जातो.

विषाणू, रासायनिक घटक, दूषित पाणी,द्रव्ये, प्राणी तसेच काही वनस्पतींमुळे अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

वाढत्या औद्योगिकरणामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये तसेच सवयींमध्येही मोठा फरक पडला आहे. सार्वजनिक ठिकाणी अन्नाचे वाटप, आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्नधान्याचा व्यापार, पोल्ट्री उत्पादने, रासायनिक खतांचा वाढलेला वापर तसेच तयार डबाबंद अन्न यामुळे अन्नघटक काही प्रमाणात दूषित झालेले आढळून येतात.

अनेकदा अन्न तयार करताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्याचा परिणाम अन्न खराब होते आणि त्याचा परिणाम अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढते. साधारणपणे मांसाहारामुळे विषबाधा होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते.

अन्नविषबाधा लक्षणे

अन्नातून विषबाधा झाल्यास सदर व्यक्तीला थंडी वाजून ताप येणे, चक्कर येणे, पोटात मळमळणे, उलटी होणे, त्याचबरोबर पाण्यासारखे पातळ जुलाब होणे यासारखा त्रास होतो. सतत जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे शरिरात पेटके येतात. कधी कधी विषबाधा जीवघेणी ठरू शकते.

bhel

अन्नविषबाधा टाळण्यासाठी

ज्यावेळेस मटन, मासे आदी मांसाहार तयार करायचा असतो, त्याआधी सदर प्राण्यांची योग्य ती तपासणी होणे आवश्यक असते. मांसाहार घेणाऱ्यांनी नेहमी ताजे मांस जेवणासाठी वापरावे. तसेच अन्न शिजवल्यानंतर लगेच खावे. अन्न बनविल्यानंतर अधिक काळ ठेवू नये आणि शिळे अन्न खाऊ नये. स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावे. तिथे उंदीर, माशा, घुशी येवू नयेत म्हणून स्वच्छता राखावी.

नेहमी ताजे पदार्थ जेवणासाठी वापरावेत. स्वयंपाक करणारी व्यक्तीने स्वतःदेखील स्वच्छता बाळगली पाहीजे. त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा संसर्ग असू नये. तसेच जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. जेवणासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ धुवून घ्यावी.तसेच जेवणात वापरले जाणारे पदार्थही स्वच्छ करून घ्यावेत. अशाप्रकारे काळजी घेतली तर अन्नविषबाधा नक्कीच टाळता येईल.

-AV News Bureau