कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत टोल माफी

  • अविरत वाटचाल  न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 15 सप्टेंबर 2023

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांकडून टोल न आकारण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे चाकरमान्यांना टोल सक्तीतून दिलासा मिळणार आहे.

टोल माफीसंबधीचा  शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-पुणे एक्सप्रेस), मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार विभागाने आज पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘ #गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेची माहिती पोलीस व परिवहन विभागाने नागरिकांना देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

========================================================

========================================================