औकात कुणाची ? किती ? आता दाखवूनच देऊ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

मुंबई, 28 जानेवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही कमी जागा घेवून सोबतच्या मित्रांनाही सामावून घेण्यासाठी आग्रही होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत ते 151 जागांसाठीच अडून बसले आणि युती तोडली, असे युती तुटण्यामागचे कारण सांगत येत्या 21 फेब्रुवारी रोजी औकात कुणाची ? आणि किती ? हे दाखवूनच देऊ, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मारला.

गोरेगाव येथे भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, पूनम महाजन, किरीट सोमय्या आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेने पारदर्शी कारभाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शकतेची अट युतीसाठी ठेवली होती. मात्र पारदर्शक कारभाराची अट त्यांना मान्य का नाही? असा सवाल करीत युतीसाठी जागांच्या वाटपाचा मुद्दा नव्हताच मुळी. आम्ही कमी जागा घ्यायला तयारही होतो. मात्र युती करायची नाही असे शिवसेनेने आधीच ठरवले होते. त्यामुळेच युती तुटली, असे फडणीस म्हणाले.

भगवा झेंडा हातात घेऊन हप्ता वसूली करण्यासाठी जनतेने सत्ता हाती दिलेली नाही, असे सांगत दोन्ही काँग्रेसशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. तर शिवसेनेशी मतभेद विचारांशी नाही तर आचाराशी आहे. शिवसेनेच्या आचारामुळेच आम्ही फारकत घेतली आहे, असेही फडणवीस यांनी शिवसेनेला सुनावले.

शिवसेनेसोबत आमचे हिंदुत्वाचे नाते होते. या मुदद्यावरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र आता शिवसेनेला 25 वर्षानंतर युतीत सडत असल्याचे वाटू लागले आहे. परंतु या 25 वर्षांत आम्हीदेखील शिकलो की, कुणासोबत फरफटत जायचे नाही. आगामी निवडणुकांसाठी भाजप पूर्ण तयारीत आहे. विधानसभेच्यावेळीही शिवसेनेने युती तोडल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. लोकांनाही भाजपची ताकद कळली. त्यामुळे राज्याचा कारभार पारदर्शकतेनुसारच चालेल, अशी ग्वाही देत येत्या निवडणुकीतही जनता आपल्या पाठिशी उभी राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवला.

  • मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला कौरव म्हणून संबोधले. मात्र त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी शिवसेनेला कौरव म्हणणार नाही. नाहीतर आम्ही कौरवांसोबत राज्यकारभार चालवितो, असा अर्थ होईल, अशी कोपरखळीही  स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी मारली.