चांद्रयान मोहिम वेळेप्रमाणेच होणार

इस्त्रोची ट्विटरवर माहिती

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 22  ऑगस्ट 2023:

भारताच्या चांद्रयान- 3 (chandrayaan-3)  या मोहिमेविषयी सर्वांचीच उत्सुकता आणि उत्कंठा वाढली आहे. अंतराळ मोहिमेमधील नवा इतिहास घडवण्यासाठी आता काही तासच बाकी आहेत. इस्रोने काहि वेळापूर्वी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 मिशन हे शेड्युलनुसारच आहे. सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. चांद्रयान भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:04 वाजता चंद्रावर उतरण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे.

चांद्रयान -2 चा ऑर्बिटर आणि चांद्रयान -3 (chandrayaan-3) च्या लॅण्डर मोड्यूल विक्रम यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला आहे. यामुळे लॅण्डर विक्रमशी संवाद साधण्यासाठी एक अतिरिक्त साधन असणारे चॅनल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणे शक्य होणार आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत सोडण्यात आलेले चांद्रयान -2चंद्राभोवती प्रदक्षिणा करत आहे. लॅण्डर मॉड्यूल चंद्रावर उतरवण्यासाठी सुरक्षित क्षेत्र शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लॅन्डरला असणारे संभाव्य धोके ओळखून ते टाळण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्र घेतली आहेत. उद्या हे मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. याचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाहिनीवर तसंच इस्रोचे संकेतस्थळ आणि सोशल मिडियावर संध्याकाळी 5: 20  पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयन 2 मोहीमेदरम्यान हार्ड लँडिंगमुळे यानाशी असलेला संपर्क तुटला होता. यावेळी चांद्रयान 3 (chandrayaan-3) लँडर मोड्यूल आणि अजूनही कक्षेत भ्रमण करत असलेल्या चांद्रयान 2 ऑर्बिटर यांच्यात दुहेरी संपर्क राखण्यात इस्रो यशस्वी झाली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग म्हणजे अलगद उतरणे , चंद्रावर रोव्हर रोविंग आणि तिथे स्थापित होऊन वैज्ञानिक प्रयोग करणे हि चांद्रयान 3 ची मुख्य उद्दिष्टे आहेत.

चांद्रयान 1 मोहिमेमध्ये यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध लावला होता. जी संपूर्ण जगासाठी एक नवी माहिती होती. या माहितीचा उपयोग नासाने आपल्या पुढच्या प्रयोगांमधे केला होता.

चांद्रयान -3 (chandrayaan-3) मोहिमेसाठी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर आपले यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल, मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश असेल.

==================================================