विमानतळ प्रकल्प बाधितांच्या जमिनी ‘फ्री होल्ड’

airport punarvasan

सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक गगरानी यांची माहिती

नवी मुंबई,7 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या साडेबावीस टक्यांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती सिडकोचे संचालक भूषण गगरानी यांनी दिली. विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि पुनःस्थापन जागेची पाहणीचा दौरा आज पत्रकासोबत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे- वर्मा, तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिडकोचे भूखंड हे साठ वर्षाच्या लीजवर देण्यात येतात. मात्र विमानतळ प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन करताना त्यांना देण्यात येणारे भूखंड हे फ्री होल्ड करावेत, अशी सिडकेची भूमिका आहे आणि  त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव डिसेंबर 2016 मध्ये राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असल्याचेही गगरानी यांनी सांगितले.

  • विमानतळ उभारणीसाठी 4 कंपन्या उत्सुक

2 हजार 268 हेक्टर जमिनीवर साकारण्यात येणा-या या आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुख्य विकासकाची नियुक्ती करण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस अंतिम निविदा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी उत्सुक चार कंपन्यांना पात्र ठरविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

  • दहा गावांचे स्थलांतर

या प्रकल्पासाठी चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरचे ओवळे, वाघिवली वाडा, वाघिवली, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या दहा गावांचे स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी 202 हेक्टरवर पुष्पक नगर वसविण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 50 करोड रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामधील 300 कोटी रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. हे पुनर्वसन सात पॉकेटसमध्ये करण्यात येणार आहे. त्यापैकी चिंचपाडा, वरचे ओवळे, उलवे, गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या सात गावांमध्ये सहा पॉकेट मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. तर वाघिवली हे सातवे पॉकेट सुरू होण्यासाठी काही वेळ अजून लागेल अशी माहिती गगरानी यांनी दिली. या सहा पॉकेटमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली असून प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास सुरूवात करावी असे आवाहन गगरानी यांनी यावेळी केलं. टप्याटप्याने  हे स्थलांतर होणार आहे.