मृत्यूच्या दाखल्यासाठी ‘ आधार’ बंधनकारक होणार ?

मुंबई, 11 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

मृत्युची नोंदणी करण्यासाठी यापुढे आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणी करताना मृत व्यक्तिची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय महानिबंधकांनी याबाबतचा आदेश नुकताच दिला आहे.

महानिबंधकांच्या सूचनेनुसार मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज करताना आधारचा उपयोग केल्यास मृत व्यक्तिच्या नातेवाईक वा ओळखीच्या व्यक्तिंना पुरवलेल्या माहितीची अचूकता पडताळून पाहता येईल. ओळख पटवण्याबाबतची फसवणूक टाळण्यासाठी ही परिणामकारक पद्धत असेल. तसेच मृत व्यक्तिची ओळख नोंद करुन ठेवण्यासाठीही मदत होईल. मृत व्यक्तिची ओळख सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्र सादर करण्याची गरज संपुष्टात येईल.

1 ऑक्टोबर 2017 रोजी वा त्यापूर्वी या संबंधीची सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महा निबंधकांनी संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत. जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय ही राज्ये वगळता, देशातल्या सर्व राज्यात ही सूचना लागू होईल. या राज्यांसाठी वेगळी सूचना काढण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले  आहे.