पनवेलमध्ये 12 लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त

liquer seized

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी आणल्याचा संशय

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नवी मुंबई, 12 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी छापा मारून लाखो रुपये किमतीचा विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला मुंबई, ठाणे महापालिकांसह जिल्हा परिषद, नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर हा मद्यसाठा विक्रीसाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

liquor seized b

पनवेल मधील मार्केटयार्ड परिसरातील एका गाळ्यामध्ये विदेशी मद्याचा साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलच्या भरारी पथक -2 ला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांच्या मार्गदर्शनानुसार, निरिक्षक एस.पी. कनसे, दुय्यम निरीक्षक पी.जी. दाते, दुय्यम निरीक्षक एस.एस. आंबेरकर, एस.एम.पाटील, जी.पी. झिटे, पी.एच पाटील, एस.एस. कदम आदींच्या पथकाने शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास छापा मारला. या छाप्यात परदेशी बनावटीच्या विदेशी मद्याच्या (स्कॉच) 1000 लिटर क्षमतेच्या 117 बाटल्या आणि बनावट लेबल, कॅप्स, मोनो कार्टून्स, बॉक्स, 472 विविध ब्रॅंडच्या रिकाम्या बाटल्या, एक वाहन  आढळून आले असून सर्व जप्त करण्यात आले आहे.  जप्त केलेल्या मालाची किमत सुमारे 12 लाख 43 हजार 450 रुपये इतकी आहे.याप्रकरणी मितेश मावज बारसणीया याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (अ) (ई) (एफ) (डी) 81, 83, 90 व 98 अन्वये अटक करण्यात आली आहे.  तर  दोन आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.

मुंबई, मुंबई उपनगरे तसेच जिल्हापरिषद, महानगर पालिका, नगर पालिकांसाठी 21 तारखेस मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर हा मद्याचा साठा जादा दराने मुंबई, ठाणे, पनवेल या भागात विक्रीसाठी आणल्याचा संशय असून त्यादिशेने तपास करण्यात येत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.