पारंपरिक घोंगडीला उद्योगाची वीण !

ghongadi

घोंगडी…खरखरीत तरीही ऊबदार !

काळी, पांढरी, खरखरीत, अंगाला टोचणारी म्हणून काहीशी नापसंत असणारी अशी घोंगडी. शहरी भागात ती फारशी लोकप्रिय नसली तरिही परंपरने जपलेली, उबदार आणि मुख्य म्हणजे औषधी गुणधर्म सांगणारी अशी ही घोंगडी. पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक घरात घोंगडी ही असायचीच. मात्र बदलत्या काळानुसार हातमागावर विणलेली आणि टिकावू अशी ही घोंगडी विकत घ्यायची झाल्यास आजकाल सहज उपलब्ध होत नाही. कारण तिचे फारसे उत्पादन होत नाही. मात्र आजच्या काळातही घोंगडी बनविण्याची परंपरा कायम टिकवण्याचा प्रयत्न जालना जिल्हातील अंबड तालुक्यातील ताहडगाव इथले दत्ता चाळके करत आहेत.

चाळके कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. दहावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर चाळके यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरूवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता या व्यव्यसायातले बारकावेही शिकून घेतले. पुढे नोकरी की व्यवसाय या पेचात न पडता त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्याचे ठरवले. अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता. कारण मुळातच घोंगडी निर्मितीच्या या व्यवसायाकडे खूपणच कमी जणांचा ओढा आहे. त्यामुळे जिद्दीने आणि वेगवेगवळ्या युक्त्या लढवून चाळके यांनी  हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. सुरूवातीला गावागावांमध्ये जाऊन घोंगडीची विक्री केली. पायी वणवणही करावी लागली. मात्र आता हस्तकला प्रदर्शन आणि महालक्ष्मी सरस यांसारख्या मोठ्या प्रदर्शनांमुळे या विक्रीला एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

घोंगडीचे महत्व ओळखणारे असंख्य ग्राहक सांगायचे की, घोंगडी विकत घ्याविशी वाटते, पण ती टोचते. तेव्हा याबाबत खूप विचार केला. लोकांना घोंगडी वापरायची आहे. मात्र त्याचा रखरखीतपणा आड येतो. आपण यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असा सातत्याने विचार मनात डोकावू लागला. त्यातूनच चाळके यांनी युक्ती लढविली. घोंगडी अंगाला टोचू नये म्हणून त्यावर मऊसूत कापड शिवले जाते. घोंगडीच्या आत कापड लावल्यामुळे तिचा रखरखीतपणा गेला आणि वापरणाऱ्याला घोंगडीची ऊबही मिळू लागली. नव्या अवतारातील घोंगडीला मागणी वाढली तरी पारंपरिक घोंगडीची मागणीही काही कमी झाली नाही. कालांतराने घोंगडीसोबत ग्राहकांच्या मागणीनुसार मग टोपी, उशी  बनवायला सुरूवात केली आणि पारंपरिक घोंगडीसह या उत्पादनांनाही लोकांनी आपलेसे करायला सुरुवात केल्याचे चाळके सांगतात. आज केवळ खेड्यात आणि शहरातच नव्हे तर परदेशातही घोंगडीला मागणी वाढत आहे. अतिशय मेहनत करून विणल्या जाणाऱ्या या  घोंगडीची किंमत साधारण साडेसातशे रूपये ते दोन हजारापर्यंत आहे.

  • घोंगडी कशी बनते

घोंगडी मेंढ्यांच्या लोकरीपासून बनविली जाते. लोकर काढण्यासाठी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. त्यानंतर त्यांच्या अंगावरील केस हळुवारपणे कातरले जातात. हे कातरलेले केस नंतर नाजूकपणे पिंजले जातात. पिंजलेल्या केसांपासून लोकर तयार केली जाते. यातील काळी-पांढरी लोकर वेगळी करण्यात येते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. या कामासाठी एक संपूर्ण दिवस लागतो. लोकरीपासून  तयार केलेले सूत दोन्ही बाजूंनी ताणून घेतलं जातं. नंतर या सुताला चांगला पीळ यावा, मजबुती यावी आणि घोंगडी विणणं सुलभ व्हावं म्हणून रात्रभर भिजवलेले चिंचुके बारीक कुटून त्यापासून बनवलेली खळ लावली जाते. साधारणपणं ही घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पुरूष विणकाम करतात तर महिलांकडे धागा बनविण्याचं काम असते.  एका घोंगडीसाठी साधारणपणे अडीच ते तीन किलो लोकर लागते. सध्या मोंढ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी लागणारी लोकर कर्नाटक आणि  आंध्र प्रदेशमधून मागविली जात असल्याचे चाळके यांनी सांगितले.

घोंगडी- 1

  • घोंगडीचे फायदे

पारंपरिक पद्धतीनं हातमागावर बनवलेली घोंगडी ही जवळपास ९ ते १० वर्षं टिकते. ही धुवावी लागत नाही. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत ही घोंगडी उपयोगात येते, बहुगुणी असलेली ही घोंगडी थंडीच्या दिवसात गरम, तर उन्हाळ्यात थंडावा देते. सांधे, पाठ, कंबरदुखीच्या रूग्णांनी घोंगडीचा वापर केल्यास फायदा होतो. लोकांनी घोंगडीचा रखरखीतपणा पाहू नये तर त्यापासून मिळणारे फायदे आणि उबदारपणा जरूर लक्षात घ्यावा. आपल्या या परंपरागत उद्योगांना जीवंत ठेवण्यासाठी हातमागावर तयार होणा-या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली तर घोंगडीसारखे अनेक पारंपरिक व्यवसायांना नवसंजीवनी मिळेल  आणि खऱ्या अर्थाने स्वदेशीची चळवळ यशश्वी होईल, असा विश्वास चाळके व्यक्त करतात.

  • बचत गटातून रोजगार निर्मिती

सुरुवातीच्या काळात लोकांनी लक्ष दिले नाही. मग जेव्हा आम्ही करत असलेल्या मेहनतीला मिळणारे यश पाहून गावकरी विचारणा करू लागले. मग आम्हीही केवळ स्वतःच्या कुटुंबाचाच  विचार न करता त्यांनी गावातील दहा महिलांनाही या उपक्रमात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी अहिल्यादेवी महिला बचत गटाची निर्मिती केली. या गटात येणा-या महिलांकडून धागा बनविण्याचे काम केले जाते. तसेच घोंगडीमधूनच आसनपट्टी, कानटोपी, गालिचा, हातमोजे, उशी असे विविध प्रकार तयार केले जातात. या वस्तूंच्या विक्रीतून गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होत असतो.

या व्यवसायावर कोल्हापूर,  सोलापूर, पुणे या भागातील जवळपास हजारो कुटुंबं अवलंबून आहेत. या कुटुंबांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी हस्तकला प्रदर्शन किंवा गावोगावी फिरावे लागते. या व्यवसायासाठी सरकारने काही योजना राबवाव्यात अशी मागणी चाळके यांनी केली आहे.

 संपर्क

दत्ता चाळके

ताडहादगांव, ता. अंबड

जिल्हाः जालना

संपर्क – 9421649566, 9922679566

 

Email : siddharth@aviratvaatchal.com