दिघ्यातील कारवाईविरोधात रेलरोके

नवी मुंबई, 13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

दिघा येथील तीन अनधिकृत इमारती आज  कोर्ट रिसीव्हरने ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध करीत ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखून धरली.

दिघा परिसरातील काही अनधिकृत इमारतीवर आज कारवाई करण्यात आली. नागरिकांचा विरोध लक्षात घेता कारवाईच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रचंड बंदोबस्तातच कोर्ट रिसीव्हरने अनधिकृत इमारती ताब्यात घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आपला मोर्चा ट्रान्सहार्बर मार्गाकडे वळवला  यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, दिघ्यातील अनधिकृत इमारतींमधील सात इमारतींना कोर्ट रिसीव्हरने 13 आणि 16 फेब्रुवारीला घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार पांडुरंग, मोरेश्वर या इमारती खाली करण्यासाठी आज कोर्ट रिसीव्हर आले होते.  या  इमारतींचा पाणी  आणि  वीज पुरवठाही तोडण्यात आला.