नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

नवी मुंबई,16 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2016-17 वर्षाचे सुधारित व सन 2017-18 वर्षाचे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी गुरूवारी स्थायी समितीपुढे सादर केले.

सन 2016-17 च्या मूळ अंदाजाच्या तुलनेत सन 2017-18 मध्ये रु. 975.37 कोटी एवढया म्हणजेच जवळपास 48 टक्के वाढीसह, रु. 355.65 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 2999.47 कोटी जमा व रु. 2998.48 कोटी खर्चाचे आणि रु. 99 लक्ष शिलकीचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2017-18 चे मूळ अंदाज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले.

शहरातील सर्वच घटकांना अपेक्षित असलेल्या योग्य सेवा-सुविधांची दर्जात्मक पूर्तता करण्यासाठी व महानगरपालिकेचे कामकाज ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करुन, नागरिकांना सुलभ, सोयीचे, पारदर्शक व गतिमान व्हावे याकरीता नवी मुंबई या आधुनिक शहराच्या गरजा व प्राथमिकता लक्षात घेऊन खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आल्याचे  आयुक्त मुंढे यांनी सांगितले.