उलवे अग्निशमन केंद्र कधी सुरू होणार ?

 

पनवेल महापालिका आणि सिडकोमध्ये कर्मचारी भरतीबाबत टोलवाटोलवी

 

स्वप्ना हरळकर / अविरत वाटचाल न्यूज

 

नवी मुंबई, 23 जुलै 2017/AV News Breau:

नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडमध्ये सिडकोने अग्निशमन केंद्र उभारले आहे. मात्र या केंद्रासाठी लागणारे मनुष्यबळ कोणी पुरवायचे याबाबतचा चेंडू सिडको आणि पनवेल महापालिका एकमेकांवर भिरकावत आहेत. सिडको आणि पनवेल महापालिकेच्या या वादात उलवेवासियांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे उलवे अग्निशमन केंद्र केव्हा सुरु होणार, असा प्रश्न उलवे परिसरातील नागरिकांना पडला आहे.

 

सिडकोने उरण तालुक्यात उलवे नोड विकसित केला आहे. किल्ला ते उरण कडे जाणा-या मार्गावर वहाळ गावापासून आतील बाजूस उलवे नोड मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. उलवे नोडमध्ये सिडकोने उन्नती हा गृहप्रकल्प उभारताना शेजारीच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले आहे. मात्र अद्याप ते सुरू झालेले नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रिय विमानतळ प्रकल्पामुळे उलवे नोडला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. या भागातील रिअल इस्टेटचे भावही आकाशाला भिडू लागले आहेत. या नोडमध्ये घरे घेण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होवू लागली आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र एकीकडे लोकसंख्येचा वाढता आलेख तर दुसरीकडे अग्नि सुरक्षेच्या सुविधांबाबतची वानवा असा विरोधाभास सध्या उलवे नोडमध्ये दिसून येतो.

 

एखाद्यावेळेस आग लागली अथवा आपातकालीन परिस्थितीत पनवेल किंवा कळंबोलीतून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. मात्र ही मदत पोहोचण्यास बराच कालावधी लागणार असल्यामुळे एखाद्या दुर्घटनेची व्याप्ती वाढू शकते. त्यातच किल्ला ते उरण या मार्गावर रस्ता रूंदिकरणाची कामेही सुरूही आहेत त्यामुळे अग्निशमन दलाला इथे पोहोचण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे केंद्र लवकरात लवकर सुरू होण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्थानिक  नागरिकांनी बोलून दाखवले.

 

सिडकोच्या हद्दीत पूर्वी पनवेल अग्निशमन विभागही येत होता. आता तो पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात काम करण्या-या कर्मचा-यांना पनवेल महापालिकेत समाविषट करणार की नाही यावर उलवे केंद्रात किती कर्मचा-यांची भरती करायाची हे अवलंबून आहे. मात्र पनवेल महापालिका याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याचे कर्मचारी भरतीचा निर्णय प्रलंबित आहे.

अरविंद  मांडके, सिडको मुख्य अग्निशमन अधिकारी

 

 

सिडकोने आपले अग्निशमन केंद्र सुरू करावे. उलवे येथील त्यांचे अग्निशमन केंद्र सुरू करणे आणि कर्मचाऱ्यांना पनवेल महापालिकेत घ्यायचे की नाही या गोष्टींचा काहीच संबंध नाही.

सुधाकर शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त