महाराष्ट्राच्या कांद्यासाठी मालगाड्या

onion

मुंबई, 20 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

राज्यातील कांदा वेळेत देशाच्या विविध बाजारपेठांमध्ये वेळेत जावा यासाठी नाशिक येथून आणखी एक नवीन गाडी सोडण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेला दिले आहे. आजपासून ही नवीन गाडी चालविण्यात येणार आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन दुप्पट झाले आहे. उत्पादनाच्या तुलनेत माल दूरपर्यंत पोहोचत नसल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा यासाठी सातत्याने मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकहून कांदा देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचविण्यासाठी विशेष मालगाड्यांची सोय करण्याचे आदेश मध्य रेल्वेला दिले आहेत. सध्या चार गाड्या कांद्याच्या दिमतीला आहेत. त्यात आजपासून आणखी एका गाडीची भर पडणार आहे.

यंदा कांद्याचे उत्पादन अधिक झाल्यामुळे रेल्वेने आधीच गेल्यावर्षीच्या तुलनेत 50 टक्के अधिक गाड्या सोडल्या आहेत. नाशिक पट्ट्यातील कांदा उत्तर, पूर्व, उत्तर पूर्व आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीकडील भागांमध्ये रेल्वेद्वारे पाठविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकाधिक कांदा बाजारपेठेत उपलब्ध होण्यास मदत मिळत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.