भुयार खणून बँक लुटणारे दरोडेखोर जेरबंद

  • सीसीटीव्ही फूटेजमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई, 17 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

नवी मुंबईमधील जुईनगर सेक्टर 11 येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर भुयार खणून दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना शुक्रवारी जेरबंद करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजमुळे दरोडेखोरांचा माग काढणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या आरोपींकडून दोन वाहनांसह काही मुद्देमालही जप्त केल्याचे समजते.

जुईनगर सेक्टर 11 येथील भक्ती रेसिडेन्सी या सोसायटी खाली बँक ऑफ बडोदाची जुईनगर शाखा आहे. 13 नोव्हेंबर रोजी  एक ग्राहक जेव्हा आपलं लॉकर उघडण्यासाठी लॉकर रुममध्ये गेला, त्यावेळी आजूबाजूचे  30 लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं. 225 लॉकर पैकी 30 लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला होता.  या सर्व लॉकरमध्ये सोन्याचे दागिने होते. बँकेच्या शेजारी असलेल्या खाद्य पदार्थाच्या दुकानातून चोरट्यांनी भुयारी मार्ग बनवला आणि  तिथून प्रवेश करत बँकेवर दरोडा घातल्याचे उघडकीस आले होते.

या दरोड्यानंतर एकच खळबळ उडाली होती. चोरट्यांनी अनेक दिवस पाळत ठेवून तसेच नियोजनबद्ध दरोडा टाकल्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान मोठे होते. मात्र पोलिसांनी स्थानिक परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने या दरोडेखोरांचा छडा लावण्यात यश मिळवले.