सरकारमध्ये निरूपयोगी राहण्यापेक्षा बाहेर पडा

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांचा शिवसेनेला टोला

मुंबई, 4 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील सरकार निरूपयोगी आहे, या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मताशी काँग्रेस पक्ष सहमत आहे. त्यामुळे  शिवसेना व इतर घटक पक्षांनी या निरूपयोगी सरकारमध्ये निरूपयोगी होऊन राहण्यापेक्षा तत्काळ बाहेर पडून आपण काहीतरी उपयोगी आहेत, हे जनतेला दाखवून द्यावे असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी मारला

राज्यातील सरकारची विश्वासार्हता  दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. राज्यातील शेतक-यांचा प्रश्न अतिशय उग्र झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी असलेले सहयोगी पक्षच जनतेचा असंतोष पाहून सरकारविरोधात आंदोलन करू लागले आहेत. या आंदोलनात ज्या प्रकारचे शब्द वापरले जात आहेत ते पाहता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्रीच सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा त-हेचे विदारक आणि विसंवादी चित्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दिसले नाही, असे सावंत म्हणाले.