4,5 मार्चला आर.टी.ई. अंतर्गत 25% प्रवेशाची सोडत

kids photo

नवी मुंबई, 3 मार्च 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या शाळांमधील प्रवेशाकरीता शासनाच्या नियोजनाप्रमाणे 4 आणि 5 मार्चला दुपारी 3 वाजता ठाण्यातील कोर्ट नाक्याजवळील ठाणे पोलीस स्कूल येथे ऑनलाइन पध्दतीने सोडत (Lottery) काढण्यात येणार आहे.

वंचित तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाने या घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीच्या मंजूर जागांच्या 25% प्रवेश हे त्या त्या शाळांच्या प्रथम स्तरावर (Entry Level Point) वर करावयाचे आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच यंदाही म्हणजे 2017-18 च्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी एकूण 107 प्रवेश पात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी 16 जानेवारी  ते 3 फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण करण्यात आली. तर 5 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत पालकांकडून पाल्याचे ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडली. मात्र क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.

तरी  4 आणि 5 मार्चला पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.