व्यंकय्या नायडू देशाचे नवे उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2017 :

देशाच्या 13 व्या उपराष्ट्रपतीपदी लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व्यंकय्या नायडू यांची निवड झाली आहे.  नायडू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार गोळापकृष्ण यांचा 272 मतांनी पराभव केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन केले.

उपराष्ट्रपतीपदासाठी लोकशाही आघाडीचे (एनडीए) व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षांचे उमेदवार गोपळकृष्ण गांधी यांच्यात थेट लढत होती. मात्र संख्याबळ लक्षात घेता एनडीएच्या व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित मानला जात होता. नायडू यांना 516 मते तर गोपाळकृष्ण यांना 244 मते पडली. उपराष्ट्रपतीपदासाठी एकूण 98.21 टक्के मतदान झाले.

व्यंकय्या नायडू यांच्या विजयामुळे देशाच्या तीन मोठ्या घटनात्मक पदांवर भाजपचे नेते विराजमान होण्याची ही पहिली वेळ आहे. यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला होता.

दरम्यान,  उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर नायडू यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.दरम्यान, व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांनी अभिनंदन केले.