बुद्धवंदनेस विरोध केल्याने घणसोलीत तणाव

पोलीस कर्मचाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नवी मुंबई, 14 एप्रिल 2017/AV News Bureau:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पीकर लावून बुद्धवंदना घेण्यास पोलिसांनी विरोध केल्यामुळे घणसोलीत शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीवरून एका पोलीस हवालादाराविरोधात घणसोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या, शनिवारी अधिक चौकशी करण्यात येणार  असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घणसोली सेक्टर 9 येथील धम्मदूत सामाजिक संस्थेच्या बुद्ध विहारातही जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू होता. मात्र रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असल्याचे सांगत रबाळे पोलिसांनी बंद केला होता. यावेळी एका पोलीस हवालदारासोबत नागरिकांचा वाद झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि प्रार्थनेस विरोध करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात तक्रार करीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने बोलावण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभिर्य पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांची समजूत घातली आणि प्रार्थनास्थळी नागरिकांशी हुज्जत घालणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान, नागरिकांनी तक्रार केलेल्या पोलीस हवालदाराची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मात्र त्या पोलीस कर्मचाऱ्याने मद्यपान केले नसल्याचे उघड झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ghansoli photo- 2

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत याप्रकरणी शनिवारी अधिक चौकशी करण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ  पोलीस अधिका-यांनी सांगितले.