मुरूड बंदरावरील जेट्टीचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण

मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची विघानसभेत माहिती 

मुंबई, 22 मार्च 2017/AV News Bureau:

मुरुड बंदरावर मच्छिमारांसाठी मासे उतरविण्यासाठी मुलभूत सुविधा पुरविणे व जेट्टीचे बांधकाम करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे काम  एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. असे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य सुभाष पाटील यांनी मुरुड बंदरावर मच्छिमार जेट्टी व कोल्ड स्टोरेज उपलब्धतेबाबत प्रश्न विचारला होता.

डहाणूला जेट्टीच्या मान्यतेचा परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याला मान्यता देण्यात येईल. या ठिकाणी भूभागाचे आरक्षण ज्या कारणांसाठी केले आहे, तोच प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. बर्फ कारखान्यासाठी आरक्षित जागेवर बर्फ कारखानाच तयार होईल. बर्फ साठवणुकीचा प्रस्ताव आल्यास त्यालाही मान्यता देण्यात येईल. ससून डॉक सुशोभीकरण, मच्छिमारांच्या सुविधा अशा विविध कामासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी दिला असून, तातडीने काम पूर्म करण्यात येतील, असे जानकर यांनी यावेळी सांगितले.