अखेर नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29जून2022:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. भूमिपुत्र आणि लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश आल्याची प्रतिक्रिया लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली. भूमिपुत्र आणि लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे, अशी प्रतिक्रिया बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर  सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी विविध संस्था, संघटना, भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त संघटना यांनी एकत्र येत २४ जून २०२१ रोजी पहिल्यांदा बेलापूर इथं सिडको घेराव आंदोलन केले होते. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी 2008 पासून ही मागणी केली जात होती. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोत केला. त्यामुळे नामकरणाचा वाद चिघळला आणि भूमिपूत्रांनी एकत्र येत नामकरणासाठी लढा सुरू केला.

१० मे २०२१ रोजी नवी मुंबईतील एक सर्वसामान्य नागरिक शैलेश घाग यांनी यासाठी एकपात्री जनआंदोलन सुरू केले आणि या लढ्याला सुरूवात झाली. त्यानंतर केवळ नवी मुंबईतीलच नव्हे तर पालघर, वसई विरार इथल्या भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त यांनीही वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सहभागी होत या लढ्याला बळ दिले. काही दिवसांपूर्वीच २४ जून रोजी सिडको विरोधात घेराव आंदोलनही करण्यात आले होते.

दि.बा.पाटिल यांच्याविषयी

सिडकोच्या म्हणजेच शासनाच्या या ब्रिटिश (भारतात ज्यावेळी इंग्रज होते त्यांच्या राजवटीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सारखं) पध्दतीच्या कारभारामुळे येथील गावातील मूळ भूमीपुत्र हा अन्यायाने त्रस्त होता. अगोदरच त्याकाळात शिक्षणाचा अभाव त्यात गरिबी यामुळे शासनाविरोधात अन्यायाविरोधात लढण्याची धमक त्यावेळी करण्यास येथील गोरगरीब आगरी, कोळी, कराडी, भंडारी, मुस्लिम व बाराबलुतेदार समाजातील ग्रामस्थ धजावत नव्हते. मात्र त्यावेळी वकिलीची सनद घेतलेल्या उच्चशिक्षित प्रकल्पग्रस्त दि.बा. पाटील यांनी सिडकोच्या जुलमी कारभाराविरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर दि. बा. च्या नेतृत्वाखाली वरील नमूद केलेल्या तिन्ही तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन सिडको व शासनाच्या विरोधात अनेक उपोषणे,आंदोलने, मोर्चे काढले.

दि.बा.पाटील तत्कालीन काळात पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष ४ वेळा राज्य विधानसभेचे सदस्य, विधासभेचे विरोधी पक्षनेते, दोनदा खासदार राहिलेले आहेत. दि बांनी आपल्या यासर्वकालीन काळात लोकप्रतिनिधी म्हणून कार्याचा ठसा उमटवितांना आमदार आणि खासदार म्हणून देशातील शेतकरी, कामगार, गोरगरीबांसाठी व अनेक राज्य व राष्ट्रीय मुद्द्यांवर लढे लढून संघर्ष केलेला आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे कुळ कायदा, कमाल जमीन धारणा कायदा, रोजगार हमी योजना कायदा, सेझ विषयक अंमलबजावणी बाबतीतील त्रुटींवर सुधारणा कार्नेबाबतचा पुढाकार, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी सहभाग व तुरुंगवास, बेळगाव सीमा सत्याग्रहात लढवय्ये म्हणूनही तुरुंगवास, देशात १९६५ साली झालेल्या महागाई विरोधात केलेले आंदोलन व त्यामुळे त्यांना कारागृहात जावे  लागले, राज्य शासनात गोरगरीब प्रकल्पाच्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या बदल्यात भविष्यातील सोयीसाठी साडेबारा टक्के भूखंडाचा निर्णय, जमीन अधिग्रहण मोबदल्यात भरीव वाढ मिळवून दिली.