जागतिक ऑटिझम दिनानिमित्त विशेष उपक्रम

नवी मुंबई, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:

2 एप्रिल या ‘जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृती (World Autism Awareness Day) दिनानिमित्त’  नवी मुंबई महानगरपालिकेच्या इ.टी.सी. दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्राच्या वतीने फोरम फॉर ऑटिझम या संस्थेच्या सहयोगाने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते निळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडून ऑटिझम विषयी जनजागृतीपर संदेश प्रसारीत करण्यात आला. 5 एप्रिल रोजी इ.टी.सी. दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्राच्या वतीने ऑटिझमविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्वमग्न दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दोन्ही बाजूच्या वास्तूंस प्रतिकात्मक निळ्या रंगाची विशेष प्रकाशयोजना करण्यात आली होती. यावेळी महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड आदींची भाषणे झाली.

1 एप्रिल रोजी नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस स्वमग्नतेविषयी माहिती देणारी पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली होती. 2 एप्रिल या जागतिक स्वमग्न दिनानिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये स्वमग्न व्यक्तींनी चितारलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले तसेच स्वमग्नतेविषयी माहितीपट ध्वनीचित्रफितीचेही प्रसारण वारंवार करण्यात आले. याविषयी माहिती देणारी पत्रकेही याठिकाणी वितरीत करण्यात आली.