कोकण रेल्वेच्या पाच नव्या प्रकल्पांसाठी 10 हजार कोटींची गरज

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

नवी मुंबई, 7 एप्रिल 2017/AV News Bureau:

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीत उत्तरोत्तर वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गाचे विद्युतीकरण, अनेक ठिकाणी दुपदरीकरण, चिपळूण-कराड रेल्वे मार्गासह पाच प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या पाच नव्या प्रकल्पांसाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोकण रेल्वेच्या नव्या प्रकल्पांसाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा म्हणून कोकण रेल्वेच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये वृद्धी करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे 806 कोटी रुपयांची समभाग भांडवलाची मर्यादा तब्बल 4 हजार कोटींपर्यंत वाढविण्यात आल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.

रोहा ते मंगळुर दरम्यान 740 कि.मी. लांबीच्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे या विकासकामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी समभागांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या 4 हजार कोटींच्या मदतीने कोकण रेल्वे मार्गावर महत्वाच्या कामांना चालना देण्यात येणार आहे. यामध्ये पुढील कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.

  • रोहा-वीर भागातील रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण
  • संपूर्ण कोकण रेल्व मार्गाचे विद्युतीकरण
  • कोकण रेल्वेच्या वाहतुकीची क्षमता दुप्पट करणे
  • चिपळुण-कराड रेल्वे मार्गाचे काम
  • अतिरिक्त रेल्वे मार्ग आणि नवीन क्रॉसिंग स्थानके उभारणे.

हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपयांची गरज असून पुढील 5 वर्षांत टप्प्याटप्प्याने हे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यासाठी समभागांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये 51 टक्के रेल्वे, 22 टकके महाराष्ट्र, 15 टक्के कर्नाटक, 6 टक्के केरळ भागांतून येणार आहे. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी  1200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दरवर्षी यावर व्याज देऊनही 60 ते 70 करोड रुपयांची बचत होणार आहे, असेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले.