पनवेलमध्ये मीटरप्रमाणे ऑटो रिक्षाची मागणी

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रादेशिक परिवहन विभागाला साकडे

पनवेल, 15  एप्रिल २०१७ /Av News  Bureau :

पनवेल महानगर पालिका हद्दीत शेअर रिक्षांचे प्रमाण जास्त आहे. एकाच रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पनवेल भागात मीटरप्रमाणे रिक्षा चालवल्या जाव्यात अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली. त्यानुसार मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्याचे आदेश काढण्यात येतील असे आश्वासन पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

या भागांमध्ये बसची संख्या कमी आहे. बसच्या फेऱ्याही कमी असल्याने ऑटो रिक्षाने प्रवास करावा लागतो. स्टेशन पासून घर लांब असल्याने एखाद्या प्रवाशाने वैयक्तिक रिक्षा केल्यास त्याला चाळीस रुपये मोजावे लागतात. घरापासून एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास रिक्षाचालक सांगेल ते भाडे द्यावे लागते. अश्या अनेक तक्रारी आल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष गवस यांच्या नेतृत्वाखाली पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांची भेट घेऊन या विषयावर पनवेल मनपा हद्दीत मीटरने ऑटो रिक्षा चालवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

पनवेलची लोकसंख्या त्याच प्रमाणे लोकांना होणारा आर्थिक त्रास लक्षात घेऊन लवकरच पनवेल मनपा हद्दीत जादा बस व मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्याचे आदेश काढण्यात येतील असे आश्वासन पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांना पाचारण करून यावर लवकर तोडगा काढण्यास दराडे यांनी संगितले.