मुंबईत समुद्रात अडकलेल्या चौघांची सुटका

मुंबई, 18 एप्रिल 2017:

मुंबईतील राजभवनजवळील खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या चार खलाशांची नौदलाच्या जवानांनी सोमवारी रात्री उशिरा सुटका केली.

राजभवन आणि प्रस्तावित शिवाजी महाराजाच्या स्मारकानाजवळील समुद्रात एक टगबोट समुद्रात अडकल्याबाबतचा फोन रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला. माहिती मिळताच रात्री 9.15 च्या सुमारास पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र अंधार असल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे पोलिसांना टगबोटीपर्यंत पोहोचणे कठीण जात होते. परिस्थितीचे गांभिर्य पाहून पोलिसांनी तातडीने नौदलाला पाचारण केले. त्यानंतर पोलीस आणि नौदलाने संयुक्तपणे बचावमोहिम हाती घेतली आणि रात्री 11.20 च्या सुमारास नौदलाच्या सी हेलिकॉप्टरच्या मदतीने अंधारातच टगबोटीत अडकलेल्या चार खलाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेरीत अथक प्रयत्नानंतर खवळलेल्या समुद्राशी झुंजत चारही खलाशांना पाण्याबाहेर काढून रात्री 11.45 च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी नौदलाच्या बोटीवर नेण्यात आले. तेथे चौघांचीही प्रकृती चांगली असल्याचे नौदलाच्या डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नौदलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीमुळे चार खलाशांचा जीव वाचला आहे.