‘जीसॅट-9’ उपग्रह अवकाशात झेपावला

श्रीहरीकोटा, 5 मे 2017:

जीसॅट -9 हा दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडून भारताने सार्क देशांमधील आपले स्थान अधिक बळकट केले आहे. या उपग्रहामुळे दक्षिण आशियाई देशांच्या एकमेकांशी संपर्क साधण्याची यंत्रणा अधिक बळकट होणार आहे.

श्रीहरीकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज सायंकाळी 4.57 ला जी सॅट-9 उपग्रह इस्रोच्या जीएसलएव्ही-एफ-09 या अग्निबाणाच्या मदतीने अवकाशात झेपावला. या यशामुळे अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताचा वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

जीसॅट-9 या उपग्रहामुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांना संकटकाळात एकमेकांशी तातडीने संपर्क करण्यास मदत मिळणार आहे. या उपग्रहामुळे या योजनेत सार्कमधील सहभागी राष्ट्रांना डीटीएच आणि काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘इस्रो’च्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. दक्षिण आशियाई उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा हा क्षण ऐतिहासिक असून शेजारील राष्ट्रांसोबतच्या सहकार्याच्या कक्षा रुंदावतील,असे मोदी म्हणाले.

मे 2014 मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अशाप्रकारचा उपग्रह बनविण्याबाबत इस्रोच्या वैज्ञानिकांना सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच आकाशवाणीवरील मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्कमधील शेजारी राष्ट्रांना उपग्रहाची अनोखी भेट देण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्यानुसार जीसॅट -9 हा उपग्रह आज सोडण्यात आला.

  • पाकिस्तानचा नकार

भारताने नेहमी शेजारील राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच भारत शेजारील राष्ट्रांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. त्याचाच एक भाग म्हणून म्हणून आजच्या उपग्रह प्रक्षेपणाकडे पाहिले जात होते. सार्कमधील आठपैकी सात देश या उपक्रमाचा भाग आहेत. पाकिस्तानने या उपक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. आमचा स्वतःचा अवकाश उपक्रम असून आम्हाला भारताच्या उपक्रमाची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

  • जीसॅट -9 उपग्रह योजनेतील सहभागी देश

भारत, श्रीलंका, भुतान, अफगाणिस्तान,बांगलादेश, नेपाळ आणि मालदिव यांचा समावेश

जीसॅट-9 उपग्रहाची वैशिष्ट्ये

  • 49 मीटर्स उंच
  • 2230 कि.ग्रॅ. वजन
  • खर्च 235 कोटी
  • उपग्रह निर्मितीसाठी लागलेला कालावधी
  • उपग्रहाचे आयुर्मान साधारण 12 वर्षे
  • डीटीएच आणि काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देणार
  • पॉवर – 3500 वॅट्स
  • अग्निबाण – जीएसलएव्ही-एफ-09
  • उपग्रहाचा प्रकार – दळणवळण