विजयकुमार गावितांवर गुन्हा नोंदवा

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई, 6 मे 2017 /AV News Bureau:

भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांच्यावरती एम. जी. गायकवाड समितीने आदिवासी विकास विभागात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला आहे. न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल  चार महिन्यापूर्वीच राज्य सरकारला प्राप्त झाला होता परंतु सरकारने तो दाबून ठेवला हे स्पष्ट आहे. चार महिने सरकारने गावितांवर गुन्हा का नोंदवला नाही ? याचे उत्तर पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्याचबरोबर गावितांच्या विरोधात तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे

या प्रकरणामुळे वाल्याचा वाल्मिकी करताना भाजपचा पारदर्शकतेचा मुखवटा गळून पडला असून भ्रष्टाचाराला समर्थन देणारा भाजपचा बीभत्स चेहरा समोर आल्याची टीका सावंत यांनी टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना केली .

काँग्रेस सरकारच्या काळातच न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने गावित यांना मंत्रीपदावरून दूरही केले होते. त्यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचा राजीनामा ही मागितला होता. मात्र लागलीच भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित ओरड करणा-या भाजपने गावित यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांचा वाल्मिकी करण्याची प्रक्रिया सुरु केली. गावितांवरील एकही आरोप सिध्द झाला तर दोन मिनिटांत त्यांना पक्षातून बाहेर काढू,असे एकनाथ खडसे  म्हणाले होते. परंतु गेल्या दोन वर्षात भाजप सरकारने गावितांवरील भ्रष्टाचाराच्या एकाही प्रकरणात कारवाई केली नाही , असे सावंत म्हणाले.