कामोठे, कळंबोलीच्या नागरिकांसाठी रेल्वे वेळापत्रकानुसार बस चालवणार

पनवेल, 16 एप्रिल 2017/AV News Bureau:

कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनीतील रहिवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकानुसार नवी मुंबई परिवहनच्या बस चालविण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबई परिवहनने प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी या प्रभागांत गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरु आहे.  या परिसरातील लोकसंख्या  बारा ते पंधरा लाखाच्या आसपास आहे. बहुतांश नागरिक मुंबई येथे नोकरीसाठी ये  जा करतात. त्यामुळे रेल्व स्थानकांवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेसचा वापर करतात. मात्र बस सेवा सुरु झाली तेव्हा असलेला मार्ग आणि आज सुरु असलेला मार्ग यात बदल करण्यात आल्यामुळे बस प्रवाश्यांना त्याचा त्रास होत आहे. यासंदर्भात लोकांच्या तक्रारी आल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्ठमंडळाने संतोष गवस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांची भेट घेतली. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बसची संख्या वाढवण्याचे आदेश डेपो व्यवस्थापकांना देण्यात येतील तसेच रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सुसंगत वेळापत्रक तयार करून बस चालवण्याचे आश्वासन आरदवाड यांनी शिष्ठमंडळाला दिले.

मानसरोवर रेल्वे स्थानक, खांदेश्वर रेल्वे स्थानक या ठिकाणाहून सुटणाऱ्या वेळापत्रक रेल्वेनुसार नसल्यामुळे प्रवाशांना बससाठी मोठी रांग लावावी लागते. अनेकदा नाइलाजास्तव रिक्षाने अधिक पैसे खर्च करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे परिवहनच्या बसचे वेळापत्रक रेल्वेच्या वेळेनुसार करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने नवी मुंबई परिवहनकडे केली आहे.

या शिष्ठमंडळात प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष गवस, सुनिल शिरीषकर, सुशांत सुवर, अफजल देवळेकर सरकार, कुंडलिक तिकोने, ऋषिकेश देवकर, अभिनव येलवे, रोहित देखणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.