लातूरसाठी आणखी तीन रेल्वे

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात चर्चा

नवी दिल्ली, 8 मे 2017:

लातूरकरांसाठी तीन नव्या अतिरिक्त रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. लातूर एक्सप्रेसला कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीत केल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती, त्यावर मार्ग काढावा यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.

तीन नव्या रेल्वे सेवा बिदर ते मुंबई लातूर आणि उस्मानाबाद मार्गे- ही रेल्वेसेवा १ जुलैपासून सुरु होणार आहे. यशवंतपूर-बिदर एक्सप्रेसला लातूरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. पुढील ३-४ आठवड्यात कार्यवाही होणार असून लातूर रोड ते गुलबर्गा हा नवीन मार्ग डिसेंबरनंतर सुरु होणार आहे.

लातूररोड ते गुलबर्गा मार्गाचे सर्वेक्षण सप्टेंबरपर्यंत पूर्ण केले जाऊन या वर्षाच्या अखेरीस त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी आंदोलन मागे घेऊन नव्या रेल्वे सेवांचे स्वागत करण्याचे आवाहनही रेल्वेमंत्र्यांनी केले आहे.

लातूर एक्सप्रेसला बिदरपर्यंत वाढविण्यात आल्याने त्यास विरोध म्हणून लातूर परिसरातील रेल्वे प्रवाशांनी 4 मेपासून बंद पुकारला होता.