एक दिवस ‘दप्तरा’ला सुट्टी

लखनऊ,14 मे 2017:

लहानग्या मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे याबाबत नेहमीच चर्चा होत असते.  पाठीवरचे ओझे कमी व्हावे यासाठी पालक, विद्यार्थी मागणी करीत आहेत. मात्र त्याबाबत अद्याप म्हणावा तसा तोडगा निघालेला नाही. मात्र उत्तर प्रदेश सरकारने हळूहळू त्यादिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. शाळेत केवळ अभ्यासच नाही तर मुलांना मजाही करता यावी यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळेत दप्तरच घेवून जायचे नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके आणि वह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेही वाढू लागले आहे. साधारणपणे मुले आपल्या वजनाच्या 30 ते 40 टक्के वजनाचे दप्तर आपल्या पाठीवर लादून नेत असतात. जड जप्तरामुळे मुलांना पाठीचे, मानेचे तसेच खांद्याचे दुखणे सतावते. शिवाय दप्तराच्या या ओझ्याखाली मुलांचा निरागसपणा आणि खेळकरणा दबून जात आहे. त्यामुळे मुलांच्या एकूण वजनापैकी केवळ 10 टक्के वजनाचे दप्तरच नियमानुसार नियमानुसार मुलांनी उचलणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन निदान आठवड्यातून एक दिवस तरी मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून सुटका मिळावी,अशी भूमिका उत्तर प्रदेश सरकारने घेतली आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी दप्तराशिवाय शाळेत जाता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद वाढण्यास वाव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.  उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दिनेश शर्मा यांनी यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत काहींशी शंकाही उपस्थित केल्या आहेत. शनिवारी अभ्यास घेतला नाही तर अभ्यास न करण्याचे मुलांच्या अंगवळणी पडेल. शिवाय शाळेत शिकवणारच नसतील आणि मुले केवळ खेळणार असतील, तर मग शाळेत पाठविण्याऐवजी पालक मुलांना घरीच ठेवतील, अशी भितीही व्यक्त करण्यात येत आहे.  त्यामुळे शनिवारच्या दिवशी पहिल्या टप्प्यात थोडा अभ्यास आणि नंतर खेळ अथवा इतर अक्टिव्हिटी घेतल्यास दोन्ही हेतू साध्य होतील, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र काहीही असले तरी एक दिवस दप्तरालाच सुट्टी देवून शाळेत खेळायला मुलांना नक्कीच आवडेल आणि त्यातूनच अभ्यासाबाबतही त्यांचे विचार सकारात्मक होतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे.