पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जागा निश्चित

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 9 मे 2018:

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पुण्याजवळ पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ निर्माण करण्यासाठी जागा निश्चित केली आहे,अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या कंपनीमार्फत विमानतळाचे काम करण्यात येणार आहे. सध्याचे पुण्याचे विमानतळ बंद न करण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुरंदरचे नवे विमानतळ आणि सध्याचे विमानतळ अशा दोन्हींचा वापर सुरु राहण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न असणार आहेत असेही प्रभू यांनी सांगितले.

‘एनएबीएच निर्माण’ म्हणजेच ‘नेक्स्टजेन एअरपोर्ट्‌स फॉर भारत’ च्या माध्यमातून विमानतळ बांधणीची क्षमता वाढवण्यात येणार आहे. यामध्ये पहिले योग्य प्रकारे भूमीसंपादन करण्याचे काम आहे. दुसरे विमानतळ आणि क्षेत्रांच्या विकासासाठी दिर्घ मुदतीच्या योजना तयार करणे आणि तिसरे म्हणजे, यामध्ये येणाऱ्या घटकांना बरोबर घेताना समतोल आर्थिक विकास कसा होईल, याकडे लक्ष  दिले जाणार आहे. हवाई प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करणे, कार्गो सेवेला प्रोत्साहन देणे, ‘उडान’ योजनेखाली 56 नवीन विमानतळांवरुन हवाई सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.