अन​धिकृत पार्किंग करणा-यांवर कारवाई करा

ठाणे महापालिका आयुक्‍तांचे आदेश

ठाणे,15 मे 2017/AV News Bureau :

सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमणाविरोधात कारवाई करणाऱ्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे.  स्‍टेशन रोड, गोखले रोड, राम-मारुती रोड, सुभाष पथ आणि शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या वाहने उभी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आदेश महापालिका आयुक्तांनी  आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे शहरात गेल्‍या 3/4 दिवसांपासून सातत्याने स्‍टेशन रोड, सॅटीस, गोखले रोड, राम-मारुती रोड, सुभाष पथ, वर्तकनगर, शास्त्रीनगर, तुळशीधाम, हिरानंदानी मेडोज या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्‍यांवर महापालिकेमार्फत कारवाई सुरु आहे.या कारवाई दरम्‍यान ब-याच ठिकाणी खाजगी वाहने, रिक्षा, मोटरसायकल, स्कूटर्स इत्‍यादी वाहने अनधिकृतरित्या पार्कींग करण्‍यात येत असून त्‍याचा त्रास इतर  वाहनचालक व नागरिकांना होत असल्‍याचा तक्रारी महापालिका आयुक्‍तांकडे प्राप्त झाल्‍या होत्या.  त्‍यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्‍यासाठी आज महापालिकेमध्‍ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्‍यात आली होती.  या बैठकीमध्‍ये महापलिका आयुक्त आयुक्त संजीव जयस्‍वाल यांनी संबंधितांना अनधिकृत पार्किंगबाबत कारवाई करण्‍याचे आदेश दिले.

या बैठकीसाठी वाहतुक शाखेचे उपआयुक्त संदीप पालवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, उपआयुक्त (मुख्‍यालय) संजय निपाणे, उपआयुक्त (कर) ओमप्रकाश दिवटे हे उपस्थित होते.