शिवसेनेचा ‘मी कर्जमुक्त होणारच’ मेळावा

मुंबई, 15 मे 2017/AV News Bureau:

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष यात्रा तसेच सरकारी संवाद यात्रांचे पेव फुटलेले असतानाच शिवसेनेनेही येत्या 19 मे रोजी ‘मी कर्जमुक्त होणारच’ या बॅनरखाली नाशिक येथे शेतकरी मेळावा घेणार असल्याची आज घोषणा केली.

शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी राज्याच्या विविध भागांत जावून शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील शिवसंपर्क मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून शिवसेनेतर्फे येत्या 19 तारखेला मी कर्जमुक्त होणारच, या नावाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. नाशिक येथील गंगापूर रोडवरील चोप्रा सभागृहात हा मेळावा होणार आहे.

या शेतकरी मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेतीतज्ज्ञ विनायक पाटील आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय स्वतः शेतकरीदेखील आपले अनुभव आणि भूमिका मांडणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या शेतकरी मेळाव्याला शिवसेना नेते, उपनेते, आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह सर्व मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.