पुणे जिल्हातील 13 गावांमध्ये भूगर्भात पेट्रोलचा साठा

मुंबई, 28 एप्रिल 2018 / अविरत वाटचाल न्यूज :

पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील 13 गावांमध्ये पेट्रोल, गॅस तसेच पेट्रोलियम पदार्थांचा साठा असण्याची शक्यता आहे. त्यासाठी या गावांमध्ये भूगर्भात बोअरच्या सहाय्याने चाचण्या सुरू असल्याची माहिती खनिजकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत लेखी उत्तराव्दारे दिली आहे.

इंदापूर तालुक्यातील बावडा, वकीलवस्ती, सुरवट, शेटफळ, हवेली, वडापुरी, झगडेवाडी, गोखळी, तरंगवाडी, वनगळी, रजवडी, बनकरवाडी, करेवाडी, आगोटी नं 2 या तेरा गावांमध्ये भूगर्भात पेट्रोल, गॅस, पेट्रोलियम पदार्थ असण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने तेथील जमिनीत बोअरच्या सहाय्याने चाचण्या सुरू आहेत. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विभागाने हे काम ओएनजीसी कडे सोपविले आहे असेही देसाई यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे- पाटील, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विधानसभेत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना खनिजकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी अशा प्रकारचा साठा आढळल्याचे म्हटले आहे.

या गावातून हा पेट्रोल आणि गॅसचा साठा आढळल्यास राज्यातील 25 जिल्हातून अशा प्रकारचा डाटा संकलित करून त्याबाबतची माहिती केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासन आणि ओएनजीसी यांच्या अखत्यारित ही बाब येत असून या प्रकल्पासाठी अंदाजे 650 कोटी रूपये खर्च होणार असून अकुशल कामगारांसाठी चार वर्ष रोजगार उपलब्ध होणार आहे असल्याची माहितीही सुभाष देसाई यांनी दिली आहे.