मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप योजना

30 हजार प्रति महिना मानधन मिळणार

 मुंबई,2 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

ग्रामविकासासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या प्रतिभावान युवकांचा या कार्यात सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम-2016’ हाती घेतला आहे.

शाश्वत विकासासाठी गावांना सक्षम करतानाच त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंना  मिळणार आहे. त्यासाठी त्यांना आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करता येणार आहे.  मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठांमधून  कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या २० ते ३० वर्षे वयोगटातील युवकांना १ जानेवारी २०१७ पर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईल.

एक वर्षासाठी असणाऱ्या या फेलोशिप कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारास ३० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे मानधन (विद्यावेतन) मिळेल. याकार्यक्रमाची सविस्तर माहिती व सहभागासाठी खालील संकेतस्थळाला भेट देता येईल. https://www.maharashtra.gov.in/cmrdfp2016/missionm.html

महाराष्ट्रातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी ”ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन” हा प्रकल्प हाती घेतला आहे. शासनाच्या ग्रामीण विकास प्रकल्पांमधील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातून एक हजार गावांना आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन व भारतातील प्रमुख कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणे व गावांमधील अंतिम व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवून गावांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.