फेरीवाल्यांच्या तथाकथित म्होरक्यांवर कारवाई करणार

ठाणे पोलिस आयुक्त व ठाणे महापालिका आयुक्तांची चर्चा

 ठाणे , 19मे 2017/AV News Bureau:

अनधिकृत फेरीवाल्यांना अभय देणा-या तथाकथित म्होरक्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच या समस्येच्या मुळाशी जावून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठाणे पोलिस आयुक्त परमबिर सिंग आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची महत्वपूर्ण चर्चा झाली. या समस्येच्या मुळाशी जावून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस यंत्रणा सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली.

 आज सकाळी पोलिस आयुक्त मुख्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला सह पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलिस आयुक्त सत्य नारायण आणि इतर पोलीस आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने स्टेशन परिसर, रस्ते रूंदीकरण केलेल्या ठिकाणी व ना फेरीवाला ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी इतरत्र नियमन करणे, अनधिकृतपणे रस्त्यावर रिक्षा पार्क करणा-यांना रिक्षावाल्यांना शिस्त लावणे आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली.

पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांच्या चर्चेतील मुद्दे –

  • अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे.
  • रिक्षा स्टॅंडवर रिक्षा उभी न करणाऱ्या बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करणे.
  • अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई नेमलेल्या विशेष पथकाच्या कारवाईच्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणे.
  • शहरातील फेरीवाला क्षेत्र वाढविणे.
  • शहरात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविण्यासाठी जागेची पाहणी करणे.
  • रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्यासाठी पोलिस उपायुक्त स्तरावर कारवाई करण्यासाठी महापालिकेतर्फे ३ क्रेन देणे.
  • सर्व बेवारस वाहने डायघर येथे स्थलांतरित करणे.
  • पोलिस स्टेशनच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्या डायघर येथे हलविणे.
  • स्टेशन परिसरात उच्च प्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व त्याची लिंक पोलिस मुख्यालयात देणे .
  • कायदा आणि सुरक्षेच्यादृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईच्यावेळी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे वापरणे.