ठाणे वर्चस्वाची लढाई

  • सिध्दार्थ हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २८ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु असली तरी संपूर्ण राज्याचे लक्ष ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपही ठाणे आपल्या वर्चस्वाखाली राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे भाजप किंवा एकनाथ शिंदे गट यापैकी कुणाचाही उमेदवार जाहीर झाला तरी ठाण्यावर वर्चस्व कोणाचे राहणार याबाबतची ही खरी लढाई असणार आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार मैदानात दोन हात करणार आहे. या जागेसाठी भाजपसह एकनाथ शिंदे गट कमालीचा आग्रही दिसतो. भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक , आमदार संजय केळकर आणि इतरांची नावे चर्चिली जात आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आ. प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा अधिक सुरु आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकांवर बऱ्यापैकी प्रभाव (पकड) दिसून येतो. एकनाथ शिंदेंच्या महानगरपालिकांमधील वाढत्या प्रभावामुळे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्याही गोटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय मुंबईसह ठाणे आणि इतर महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात जागा वाटपावरून तिन्ही मुख्य पक्ष सरकारमध्ये एकत्र असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मतभेद होत असल्याचे दिसून येते.

एकनाथ शिंदेंसमोरील आव्हान

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच बालेकिल्ला आहे. जर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर मुख्यमंत्र्यांचेच भाजपसमोर काही चालत नाही, असा संदेश राज्यभरातच नव्हे तर देशभरात जाईल,ही चिंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतावत असावी. तर दुसरीकडे ठाण्यातून भाजपने आपलाच उमेदवार जरी दिला तरी भाजप आपल्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना योग्य ती वागणूक देत नाही,असा एक संदेश देशपातळीवर जाईल आणि हे भाजपसाठीही डोकेदुखी ठरू शकते.

उद्धव ठाकरे यांच्यापासून विभक्त होत शिवसेना पक्षच ताब्यात घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर नाराज शिवसैनिकांचा राग कमी करून ठाण्यातील गड राखण्याचे मोठे आव्हान आहे.  त्यामुळेच लोकसभेची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिंदे गटाकडून इतर नावांची चाचपणी सुरु असली तरी आ. प्रताप सरनाईक यांचे नाव आघाडीवर आहे. सरनाईक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपलाच अधिक मेहनत करावी लागेल. कारण एक एक जागा जिंकणे हे भाजपचे टार्गेट असल्यामुळे त्यांच्यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. मात्र शिंदेंचा उमेदवार जिंकल्यास एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील प्रभाव आणखी वाढेल, जो बाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी कदाचित डोकेदुखी ठरू शकेल. कारण विधानसभा निवडणुकीसाठी महायुती होईल की नाही, याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचे हात बळकट करणे भाजपसह अजित पवार, राज ठाकरे यांना भविष्य़ातील राजकारणाच्यादृष्टीने कितपत सोयीचे राहील, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व बाबींचा विचार करता राजकीय पटलावर टिकण्यासह ठाण्यावरील वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

महायुतीपुढे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना प्रधानमंत्री म्हणून निवडून आणायचे,हाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुले जागा वाटपात शिंदे गटाला झुकते माफ मिळाल्यास भाजपसह अजित पवार, राज ठाकरे आणि महायुतीमधील मित्र पक्षांना एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच एकनाथ शिंदेगटाऐवजी भाजपला उमेदवारी मिळाल्यास एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि महायुतीमधील मित्र पक्षांना भाजप उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावे  लागतील, हे नक्की. त्यामुळे उमेदवार महायुतीमधील कुठल्याही पक्षाचा असला तरी त्यास निवडणून आणण्याची जबाबदारी महायुतीमधील सगळ्याच पक्षांवर असणार आहे. म्हणूनच ठाण्यातून उमेदवारी कोण मिळवणार यातूनच ठाण्यावर वर्चस्व कुणाचे राहणार हे दिसून येईल.

राजन विचारेंसाठी लढाई अटीतटीची

उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे असून अखंड शिवसेना असताना ठाण्याचे विद्यमान खासदार म्हणून निवडून आले. आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खासदारकी कायम ठेवण्याचे आव्हान राजन विचारे यांच्यासमोर आहे. राजन विजारे यांना मिळणारी मते ही जास्तकरून भावनिक असणार आहेत. शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक कमालीचा नाराज झालेला आहे. त्यांची मते विचारेंच्या पारड्यात पडतील,याबाबत दुमत होणार नाही. मात्र तरीरी राजन विचारे यांचा ठाण्यातील विविध भागांसह नवी मुंबईतील वावर आणि लोकांशी कितीसा संपर्क आहे यावरही बरेच काही अवलूंन असणार आहे. लोकांशी खासकरून नवी मुंबईचा विचार करता राजन विचारेंची म्हणावी तशी नाळ नवी मुंबईकरांशी जुळलेली दिसत नाही. ठोस अशी विकास कामे सांगायची म्हटली तर लगेचच डोळ्यासमोर तशी ती कामे येत नाहीत. शिवाय विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, विजय नहाटा या नवी मुंबईतील नेत्यांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे नवी मुंबईत शिवसेना तेवढी सक्षम राहीली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे राजन विचारे यांची लोकसभेची वाटचाल दिसते तेवढी सोपी वाटत नाही.

भाजपसमोरील आव्हान

शिवसेनेचे विद्यमान खा. राजन विचारे यांच्याविरोधात भाजपच्यावतीने माजी खा. संजीव नाईक यांचे नाव सातत्याने समोर येते. राजकीय वजन असलेल्या संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाल्यास नवी मुंबईसह ठाण्यात नाईक फॅक्टरला पुन्हा बळ मिळेल. अशावेळी गणेश नाईक यांचे वर्चस्व वाढेल. या दबावापोटी महायुतीमधील भाजपव्यतिरिक्त (तसेच भाजपमधीलही काही घटक) इतर पक्ष, खासकरून या सर्व पक्षांचे स्थानिक नेते मंडळी संजीव नाईकसांसाठी मनापासून मेहनत करतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गणेश नाईकांच्या घराणेशाहीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय. त्यामुळे या मुद्द्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचाही फटका भाजपला बसेल का, याचाही विचार भाजपच्या नेतृत्वाकाला करावा लागणार आहे. कारण आता भाजपला उमेदवार कोण हे महत्वाचे नसून एक एक जागा जिंकून पदरात पाडून घेणे हेच प्रमुख लक्ष्य आहे. त्यामुळे ठाण्याची जागा जिंकायचीच यादृष्टीने सर्व मित्र पक्षांचा अधिक विरोध नसलेला उमेदवार निवडण्याची खेळी कदाचित भाजपकडून खेळली जाईल. त्यातून चर्चेतील नावे वगळण्याची तयारीदेखील भाजप नेतृत्व दाखवेल. कारण ठाण्यावर वर्चस्व मिळवण्यापेक्षा देशाचे नेतृत्व करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ठाण्यावर वर्चस्व कोणाचे राहणार हा मुद्दा लक्षात ठेवूनच देशपातळीवरील यशासाठीची गणिते मांडण्यासाठी भाजपची कसोटी लागेल हे नक्की.

========================================================


========================================================

========================================================