‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’चा गल्ला २८ कोटी

तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई

मुंबई, 29 मे 2017/AV News Bureau:

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने अनेक विक्रम साकार करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपटही बॉक्सऑफीसवर धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा २८ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सचिन तेंडुलकरचे जीवन आणि त्याचे क्रिकेटविश्व यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे त्याच्या चाहत्यांनी चांगलेच स्वागत केले आहे. सचिन तेंडुलकरचा क्रिकेट प्रवास, या प्रवासात त्याला मदत करणाऱ्या व्यक्ती, शालेय पातळीवरील क्रिकेट, प्रथम श्रेणीतील क्रिकेट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सचिनचा उदय, त्याचे विश्वविक्रम आदी सचिनशी संबंधित सर्व बाबींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सचिनचे क्रिकेट साऱ्यांनीच पाहीले आहे. तरीही पडद्यावरील सचिनचा प्रवास लोकांना आणखी सुखावतो. त्यामुळेच सचिनवरील प्रेमाखातर लोकांनी  ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’लाही पसंती दिली आहे.

मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलगु आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २८ कोटींचा कमाईचा टप्पा ओलांडल्याचे  चित्रपट समिक्षक तरण आदर्शने ट्विट केले आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 8.40 कोटींची कमाई केली. शनिवारी 9.20 कोटी तर रविवारी 10 कोटी 25 लाखांची कमाई केली होती.

सचिन अ बिलियन ड्रीम्सची विविध भाषांमधील कमाई

  • हिंदी -24.45 कोटी
  • मराठी -1.20 कोटी
  • इंग्लिश- 42 लाख
  • तेलगु- 1.05 कोटी
  • तमिळ – 93 लाख