जोडीदाराच्या उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागणार

केंद्र सरकारकडून निवडणूक नियमांमध्ये सुधारणा

नवी दिल्ली, 27 मे 2017/

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना यापुढे आपल्या उत्पन्नाच्या स्रोतासह पत्नीच्याही उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी केलेल्या सूचनेनंतर केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवाराला स्वतःसह पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोतही जाहीर करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने याबाबत गेल्यावर्षी कायदा मंत्रालयाकडे विचारणा केली होती. आपण सुचविलेल्या सुधारणांमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असे आयोगाने नमूद केले होते. निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांनंतर केंद्र सरकारने याबाबत निवडणूक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन नियम 7 एप्रिल रोजी कायदा विभागाने जाहीर केले आहेत.

यापूर्वी निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या तसेच अवलंबून असलेल्या तीन व्यक्तींच्या संपत्तीची माहिती जाहीर करावी लागत होती.नव्या नियमानुसार आजा जोडीदाराच्या उत्पन्नाचा स्रोतही प्रतिज्ञापत्रात उमेदवाराला जाहीर करावा लागणार आहे.  याव्यतिरिक्त निवडणूक लढवू इच्छिणारी व्यक्ती कुठल्या लाभाच्या पदावर कार्यरत आहे का ? अथवा सरकारी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करीत आहे, हेदेखील जाहीर करावे लागणार आहे. कारण लाभाचे पद तसेच सरकारी कंपनीत नोकरी करणारी व्यक्ती निवडणूक लढवू  शकणार नाही.