कोकण रेल्वे मार्गावर आजपासून पेट्रोलिंग

नवी मुंबई, 31 मे 2017/AV News Bureau:

मोसमी पावसाला आता लवकरच सुरूवात होणार असली तरी गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस कोसळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू रहावी यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आजपासून विशेष पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे.

कोकण पट्ट्यात  पाऊस  कोसळू लागला आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळणे वा इतर कोणतीही अनुचित घटना घडून गाड्यांचा खोळंबा होवू नये म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावर आजपासून व्यापक पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक बी. निकम यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्ग हा डोंगर कपारीतून जात असतो. कोकणात पावसाचे प्रमाण प्रचंड असते.  त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे मार्गावर माती वा दरड कोसळण्याची भिती असते. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग संवेदनशील बनतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्याचा वेग कमी करून वेळापत्रकही बदलण्यात येते. तसेच रेल्वे गाड्या जाण्यापूर्वी मार्ग रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी व्यापक प्रमाणात पेट्रोलिंग करण्यात येते.