मुंबई-गोवा महामार्गावर 10 कि.मी.च्या अंतराने मदत केंद्र

  • कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल  बजाज यांची माहिती
  • गणेशोत्सवानिमित्त कोकणात चाकरमान्यांची वर्दळ वाढली

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 13 सप्टेंबर 2018:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रीघ सुरु झाली आहे. या काळात मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेवून कोकण विभागातील पोलिसांनी कंबर कसली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई- गोवा महामार्गावर तळकोकणापर्यंत सुमारे 10 कि.मी.च्या अंतराने  मदतकार्य करणारी एकूण 46 केंद्र उभारण्यात आल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी अविरत वाटचाल न्यूजशी बोलताना दिली.

प्रत्येक 10 कि.मी. अंतरावर 46 मदत केंद्र

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात गणपतीसाठी खासगी वाहनांनी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वेळेवर मदत मिळावी तसेच चहापानाची सोय व्हावी यासाठी तळकोकणापर्यंत प्रत्येक 10 कि.मी. अंतरावर केंद्र उभारण्यात आली आहेत. गेल्यावर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळेच यंदाही अशाप्रकारची केंद्र उभारण्यात आली असून त्यामध्ये वाहन दुरूस्तीसाठी एक मॅकेनिक, अॅम्ब्युलन्स, एक क्रेन, चहापानाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,असे बजाज यांनी सांगितले.

 

महामार्गावरील खड्ड्यांचे मॅपिंग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची 10 सप्टेंबरपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर गर्दी होवू लागली आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  त्यामुळे पीडब्लूडी, एनएचएआय आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत मार्गावरील सर्व खड्ड्यांचे मॅपिंग करून खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणांनी सुरु केल्याचे बजाज यांनी सांगितले.

  • कोकण विभागात रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे आदी महत्वाचे जिल्हे आहेत. गणेशोत्सवानिमित्त पोलीस बंदोबस्त आणि इतर उपाययोजनांसाठी दोन पोलीस अधिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी स्थानिक पोलिसांसह सुमारे 400 अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

=========================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्ग ऑक्टोबरमध्ये सुरु- सिडको एमडी