प्रलंबित खटल्यांसाठी न्यायमित्र नेमणार

केंद्रीय कायदामंत्री रवि शंकर प्रसाद

लखनऊ,7 जून 2017:

देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये गेल्या दहावर्षांपासून प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार देशभरात न्यायमित्रांची नियुक्ती करणार असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात काल झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

देशभरातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये तब्बल साडेसात लाख खटले प्रलंबित आहेत. हे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून न्यायमित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्यामुळे गोरगरीब लोकांना तातडीने आणि वेळेत योग्य पद्धतीने न्याय मिळू शकेल,असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.