पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण हटविणार

ठाणे, 24 जून 2017/AV News Bureau:

वन आणि रेल्‍वे विभागाच्‍या अखत्‍यारीतील पारसिक बोगद्यावरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, मध्य रेल्‍वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्‍वाल सोबत आयोजित करण्यात आली होती.

या परिसरात वास्तव्याला असलेल्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा निचरा होतो. हा भाग डोंगर उताराच्‍या लगत असल्‍याने पावसाळयात डोंगर उताराचा भाग कोसळून वा भूस्खलन होऊन मोठया प्रमाणात जिवीत व वित्तहानी होण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय पारसिक बोगद्यामधून रेल्‍वेची सतत ये-जा सुरु असते.  त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये या दृष्‍टीकोनातून कृती आराखडा तयार करुन त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्त जयस्‍वाल यांनी दिले.

यामध्‍ये पारिसक बोगद्यावरील अतिक्रमणधारकांची यादी तयार करणे, सदर जागेचा भोगवटा 72 तासांचे आत रिक्त करण्‍याकरीता आजच पोलिस बंदोबस्‍तात नोटीस बजावणे, या परिसरातील     बाधित होणा-या पात्र अतिक्रमणधारकांची यादी तयार करुन पुनर्वसन धोरणानुसार त्‍यांचे पुनर्वसन करणे इत्‍यादी निर्णय या बैठकीत घेण्‍यात आले. दरम्‍यान, नोटीस कालावधी संपल्‍यानंतरही अतिक्रमणधारकांनी भोगवटा रिक्त न केल्‍यास सर्व विभागांमार्फत संयुक्तपणे कारवाई करण्‍यात येईल असेही आदेश  जयस्‍वाल यांनी दिले.